कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 21:57 IST2025-02-02T21:57:34+5:302025-02-02T21:57:47+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा शांततेत

कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी गैरहजर
संदीप आडनाईक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ उपकेंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी एकुण १६,२२४ अर्जापैकी १३, ८९५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली तर तब्बल २, ३२९ विद्यार्थी गैरहजर राहिले. या कालावधीत कोणत्याही उपकेंद्रावर गैरप्रकार घडला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
रविवारी सकाळी ११ ते १२ या एका सत्रात ही महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. प्रश्नप्रत्रिका आणि उत्तरपत्रिका केंद्रावर पोहचविण्यासाठी १४ समन्वय अधिकाऱ्यांसह २८ सहायक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. या परिक्षेसाठी ५३ उपकेंद्र प्रमुख, १६९ पर्यवेक्षक, ६७६ समवेक्षक, ३७१ राखीव कर्मचाऱ्यांसह १८० पोलीस कर्मचारी असे एकूण १,४९१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली होती. एका तासाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते १२ यावेळेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न सोडवले. गणित, बुध्दिमत्ता चाचणी, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडीवर प्रश्न विचारले होते. हा पेपर काहींना सोपा तर काहींना कठीण गेल्याची प्रतिक्रिया परिक्षार्थींनी दिल्या.