अबब... कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत प्रभाग रचनेबद्दल २४ हजार हरकती
By समीर देशपांडे | Updated: October 29, 2025 16:29 IST2025-10-29T16:28:59+5:302025-10-29T16:29:34+5:30
अंतिम रचना शुक्रवारी जाहीर : कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष

अबब... कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत प्रभाग रचनेबद्दल २४ हजार हरकती
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपंचायतींची प्रभाग रचना ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान या रचनेवर जिल्ह्यातून तब्बल २३ हजार ८२० हरकती घेण्यात आल्याने याबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले होते. त्यानुसार पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नंतर नगरपालिका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका घेण्याचे सुतोवाच नेत्यांकडून होत होते.
दरम्यान मराठवाडा, विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर राजकीय संदर्भ बदलले आहेत. अजूनही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. पुन्हा पाऊस सुरू झाल्यने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांचे लक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांकडे लागले आहे. यासाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत वरीलप्रमाणे हजारो हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. ७ नोव्हेंबरला मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता ३१ तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या आहेत हरकती
- विचित्र पद्धतीने प्रभाग फोडण्यात आले आहेत.
- नागरिक वार्ड ६ मध्ये राहायला आहे आणि त्याचे मतदान वार्ड क्रमांक ७ मध्ये दाखवण्यात आले आहे.
- संलग्न भाग वगळला आहे.
- यामुळे आरक्षणातही बदल झाला आहे.
नगरपालिका, पंचायती आलेल्या हरकती
- जयसिंगपूर नगरपालिका : ९८८२
- शिरोळ नगरपालिका : २४९८
- आजरा नगरपंचायत : २२१२
- वडगाव नगरपालिका : १७८३
- कुरूंदवाड नगरपालिका : १६४३
- गडहिंग्लज नगरपालिका : १४४८
- चंदगड नगर पंचायत : १३४४
- हातकणंगले नगर पंचायत : ९८३
- हुपरी नगरपालिका : ९२६
- कागल नगरपालिका : ६७८
- पन्हाळा नगरपालिका : २१४
- मलकापूर नगरपालिका : १२४
- मुरगुड नगरपालिका : ८५
- एकूण २३,८२०
नगरपंचायतीचे प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडले आहेत. त्यामुळेच आजऱ्यासारख्या छोट्या नगरपंचायत कार्यक्षेत्रातूनही २२०० हून अधिक हरकती घेण्यात आल्या आहेत. - रशिद पठाण, आजरा