कुलगुरूपदासाठी २४ अर्ज!
By Admin | Updated: April 22, 2015 00:33 IST2015-04-21T01:04:20+5:302015-04-22T00:33:42+5:30
शिवाजी विद्यापीठ : प्राध्यापकांचा समावेश

कुलगुरूपदासाठी २४ अर्ज!
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. या मुदतीपर्यंत विद्यापीठ कुलगुरू शोधसमितीकडे साधारणत: २४ अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात विद्यापीठ परिसरासह देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापकांचा समावेश आहे.
कुलगुरूपदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करणारी जाहिरात समितीने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली होती. त्यात २० एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार समितीचे संपर्क अधिकारी डॉ. बी. चंद्रशेखर यांच्या ई-मेलवर तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे सुमारे २४ प्राध्यापक उमेदवारांनी अर्ज पाठविले. त्यात शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. टी. शिर्के, राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. वासंती रासम, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एन. भोसले, माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. बी. देशमुख, भौतिकशास्त्र विभागातील डॉ. सी. डी. लोखंडे, इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. ए. ए. अत्तार, जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. एस. पी. गोविंदवार, समाजशास्त्र विभागाचे डॉ. आर. एन. साळवे यांच्यासह औरंगाबादचे डॉ. विनायक भिसे, पुण्यातील प्रा. डॉ. सुभाष देवकुळे, राजस्थानमधील डॉ. एस. बी. मिश्रा, पंजाबचे डॉ. दलविंदरसिंग गेरवाल,
उत्तर प्रदेशचे प्रा. सुरेश राणा, जगदीश क्षीरसागर आदींच्या अर्जांचा समावेश असल्याचे समजते.
दरम्यान, याबाबत कुलगुरू शोधसमितीचे संपर्क अधिकारी डॉ. बी. चंद्रशेखर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कुलगुरूपदासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली असली, तरी पोस्टाच्या माध्यमातून उद्यापर्यंत अर्ज प्राप्त होतील.
दाखल झालेल्या अर्जांची संख्या दोन दिवसांत समजेल. ते छाननीच्या प्रक्रियेसाठी कुलगुरू शोध समितीकडे पाठविण्यात येतील. (प्रतिनिधी)
त्रिसदस्यीय समितीकडून छाननी
विद्यापीठ कुलगुरू शोधसमितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन आहेत. त्यांच्यासह उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे व विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश आहे. या समितीकडून अर्जांच्या छाननीची प्रक्रिया केली जाणार आहे.