CorornaVirus kolhpaur-सीपीआरमध्ये २०२ खाटा आणि १२८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:36 IST2021-04-10T04:25:26+5:302021-04-10T12:36:35+5:30
CorornaVirus Cpr Hospital Kolhapur-कोल्हापूर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सीपीआर रुग्णालयामध्ये गुरुवारी कोरोना रुग्णांसाठी नवीन ५० खाटांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी सध्या २०२ खाटा उपलब्ध असून, याठिकाणी १२८ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.

CorornaVirus kolhpaur-सीपीआरमध्ये २०२ खाटा आणि १२८ रुग्ण
कोल्हापूर -येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सीपीआर रुग्णालयामध्ये गुरुवारी कोरोना रुग्णांसाठी नवीन ५० खाटांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी सध्या २०२ खाटा उपलब्ध असून, याठिकाणी १२८ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.
गतवर्षीप्रमाणेच सीपीआर हे केवळ कोविड रुग्णांसाठी कार्यरत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या बाह्यरुग्णांना कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाकडे पाठविण्यात येत आहे, तसेच काही शस्त्रक्रियांची गरज असलेल्या रुग्णांना महात्मा फुले वैद्यकीय साहाय्यता योजना ज्या खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत, अशा रुग्णालयामध्ये पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सीपीआरमधील कोरोना रुग्णांच्या सोयी-सुविधा आणि चौकशीसाठी गतवर्षी बीएसएनएलने एक टोल फ्री नंबर गतवर्षी जाहीर केला होता. अशाच प्रकारचा नंबर पुन्हा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सीपीआरच्या वतीने बीएसएनएलकडे करण्यात आली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता सीपीआरमध्ये सर्व पातळ्यांवर याबाबतची तयारी सुरू आहे. ऑक्सिजन सिलिंडर्स, गरज भासल्यास कंत्राटी सेवा याबाबतची पूर्वतयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेकडून आता वैद्यकीय साहित्य किंवा औषधे मिळणार नसल्यामुळे त्याचीही आगाऊ मागणी करण्यात येत आहे.
वाॅर्ड समन्वयासाठी २० मोबाइल
सीपीआरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सर्व २० वॉर्ड आणि विभागांमध्ये समन्वय राहण्यासाठी गतवर्षी २० मोबाइल घेण्यात आले होते. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर ते रिचार्ज करण्यात आले नव्हते. मात्र, आता पुन्हा हे मोबाइल रिचार्ज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.