संशोधन शिष्यवृत्तीस मिळेना ‘सारथी’; २ हजार पीएच.डी. संशोधकांना सहा महिन्यांच्या रकमेची प्रतिक्षा
By पोपट केशव पवार | Updated: April 22, 2025 14:28 IST2025-04-22T14:27:50+5:302025-04-22T14:28:19+5:30
पोपट पवार कोल्हापूर : संशोधनाला चालना देण्याच्या वल्गना सरकारकडून केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष संशोधन करणाऱ्यांना सरकारकडून तितकेसे बळ ...

संशोधन शिष्यवृत्तीस मिळेना ‘सारथी’; २ हजार पीएच.डी. संशोधकांना सहा महिन्यांच्या रकमेची प्रतिक्षा
पोपट पवार
कोल्हापूर : संशोधनाला चालना देण्याच्या वल्गना सरकारकडून केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष संशोधन करणाऱ्यांना सरकारकडून तितकेसे बळ मिळत नसल्याचा प्रत्यय सध्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना येत आहे. सारथीच्या माध्यमातून २०१९ ते २०२३ या बॅचमधील जवळपास २ हजार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना जून ते डिसेंबर २०२४ ची शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. परिणामी,अनेकांचे संशोधन थांबले असून, प्रयोगशाळा खर्च, डेटा संकलन, प्रवास, अभ्यास साहित्य, उपकरणे यांचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न या संशोधक विद्यार्थ्यांना पडला आहे.
सारथीच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. नवीन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला ३७ हजार रुपये, तर संशोधनाची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रति महिना ४२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. संबंधित विद्यार्थ्यांने प्रत्येक पाच ते सहा महिन्यांचा अहवाल सारथी कार्यालयाकडे सादर केला की त्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होते. मात्र, जून २०२४ पासून अद्यापपर्यंत ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.
हातउसने करण्याची वेळ
सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सारथीची शिष्यवृत्ती मिळाली की, या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करता येत नाही. त्यांना पूर्णवेळ संशोधन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांचा राहण्या, खाण्यासह संशोधनासाठी लागणारा खर्चही याच शिष्यवृत्तीच्या पैशांतून करावा लागतो. ही शिष्यवृत्ती वेळेत मिळाली नाही की, या विद्यार्थ्यांना इतरांकडून हातउसने करण्याची वेळ येते. परिणामी, त्यांचे संशोधनाकडे दुर्लक्ष होते. याबाबत सारथीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याअगोदर शासनाने सारथीसाठी लागणारा निधी वर्ग करावा. जर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, या डॉ. बाबासाहेबांच्या संदेशाचे पालन विद्यार्थ्यांकडून केले जाईल. - डॉ. संभाजी खोत, समन्वयक सारथी विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य.
सारथी संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप रक्कम अनेक महिन्यांपासून थकित आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या अभ्यास, प्रबंध आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. – सौरभ पवार, सारथी संशोधक विद्यार्थी.