आजरा येथे टेम्पोसह २० लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:27 IST2021-03-19T14:25:12+5:302021-03-19T14:27:16+5:30
Excise Department Liquer kolhapur- टेम्पोच्या मागील बाजूस कप्पा करून त्यातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या विभागाने सापळा रचून आजरा येथे एस.टी. स्टँडसमोर ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने आजरा येथे विदेशी मद्याची तस्करी करणारा टेम्पो पकडला. संशयित टेम्पोचालक व जप्त केलेल्या टेम्पोसह मद्याचा साठा.
कोल्हापूर : टेम्पोच्या मागील बाजूस कप्पा करून त्यातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या विभागाने सापळा रचून आजरा येथे एस.टी. स्टँडसमोर ही कारवाई केली. या कारवाईत पथकाने सहा आसनी टेम्पो, व विदेशी मद्यसाठा असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित टेम्पोचालक ओंकार बळीराम मुळे (२३, रा. वडगाव सिद्धेश्वर, उस्मानाबाद) याला अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, आजरा परिसरातून विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या पथकाने गुरुवारी आजरा गावात एस.टी. स्टँडसमोर एक टेम्पो पकडला. त्याची तपासणी केली असता टेम्पोच्या मागील बाजूस विशिष्ट कप्पा करून त्यात विदेशी मद्याचा साठा लपवल्याचे उघडकीस आले.
विदेशी मद्य कोणाच्या निदर्शनास येऊ नये यासाठी प्लास्टिक ट्रेचा वापर करण्यात आला होता. पथकाने संशयित ओंकार मुळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विदेशी मद्य व वाहनासह २० लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या मद्याचा मूळ मालक व पुरवठादाराचा पथक कसून शोध घेत आहे.
ही कारवाई उपअधीक्षक बी. आर. चौगले, निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सुहास वरुटे, कर्मचारी सुखदेव सिद, प्रदीप गुरव, दीपक कापसे, मंगेश करपे, रवींद्र सोनवणे यांनी कारवाई केली.