Kolhapur Crime: सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत भाजप नेते समरजित घाटगेंच्या पत्नीला २० लाखांचा गंडा
By उद्धव गोडसे | Updated: June 8, 2024 18:29 IST2024-06-08T18:28:27+5:302024-06-08T18:29:59+5:30
पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची बतावणी, भीती घालून पैसे उकळले

Kolhapur Crime: सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत भाजप नेते समरजित घाटगेंच्या पत्नीला २० लाखांचा गंडा
कोल्हापूर : मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत बोगस कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिका-यांनी नवोदिता समरजितसिंह घाटगे (वय ३७, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांना २० लाखांचा गंडा घातला. हा प्रकार २ ते ५ जून दरम्यान घडला. घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नवोदिता घाटगे यांच्या मोबाइलवर रविवारी (दि. २) फोन आला. कस्टम अधिकारी असल्याचे सांगत, तुम्ही मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड आहे. हा गंभीर गुन्हा असून, तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भीती घातली. त्यानंतर दुस-या दोन नंबरवरून फोन आले. त्यांनी आपण सीबीआयमधील गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले.
तुम्ही केलेला गुन्हा गंभीर असून, तो दाखल करायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने २० लाख रुपये ऑनलाइन वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाटगे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनिल यादव, अजित (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्यासह कस्टम अधिका-यावर गुन्हा दाखल केला.