कोल्हापूर : राजाराम तलाव येथे हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणी सुरू असताना कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी उभारलेला मंडप जोरदार वाऱ्याने कोसळला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या घटनेत दोन पोलिस किरकोळ जखमी झाले. पडलेल्या मंडपाचे साहित्य तातडीने हटवण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.राजाराम तलाव येथे मतमोजणी केंद्राबाहेर कर्मचारी आणि पोलिसांना थांबण्यासाठी मंडप उभारला होता. मंडपात २० ते २५ कर्मचारी थांबले होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा आल्याने मंडप हलू लागला. खांब उखडू नयेत, यासाठी काही कर्मचाऱ्यांनी खांब पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा जोर वाढल्याने संपूर्ण मंडप कोसळला. कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने अनर्थ टळला. केवळ दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:45 IST