रस्त्यांसाठी मिळणार २५ कोटींचा निधी, राज्य सरकारची तत्वत: मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:57 IST2020-02-07T16:56:31+5:302020-02-07T16:57:59+5:30
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून महानगरपालिकेला २५ कोटींचा निधी मिळणार असून, त्याला तत्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. याबाबत लवकरच अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

रस्त्यांसाठी मिळणार २५ कोटींचा निधी, राज्य सरकारची तत्वत: मान्यता
कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून महानगरपालिकेला २५ कोटींचा निधी मिळणार असून, त्याला तत्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. याबाबत लवकरच अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच २५ कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशा सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार बुधवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्थायी समिती कार्यालयात बसून दिवसभर शहरातील चारही विभागीय कार्यालयाकडील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या मदतीने रस्त्यांची कामे व त्यांचे आर्थिक आराखडे तयार केले. हा प्रस्ताव बुधवारीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.
या २५ कोटींमधून प्रत्येक प्रभागाकरिता साधारणपणे ३० ते ४० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यात आणि महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली, तरीही शहरात कामे करताना पक्षीय भेदभाव करण्यात आलेला नाही.
सर्वच्या सर्व ८१ प्रभागांत या निधीचे समान वाटप केले जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निधीतून पावसाळ्यापूर्वी कामे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.