Kolhapur Crime: यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, अन् पैसे मिळवा; महिलेला घातला १८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:09 IST2023-07-11T13:08:42+5:302023-07-11T13:09:06+5:30
सुरुवातीला संशयिताने ६५० रुपये पाठवून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला

Kolhapur Crime: यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, अन् पैसे मिळवा; महिलेला घातला १८ लाखांचा गंडा
जयसिंगपूर (कोल्हापूर) : ऑनलाईन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्याने जयसिंगपुरातील महिला बँक कर्मचाऱ्यास १८ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताने तक्रारदार प्रगती महेश कुरणे (वय ३६, रा. गल्ली नं. २, जयसिंगपूर, मूळ गाव नदीवेस मिरज) यांच्याकडून आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाईनद्वारे पैसे घेऊन गंडा घातला.
तक्रारदार प्रगती कुरणे यांच्या व्हाॅट्सॲपवर संशयिताने तुम्ही फ्री टास्क वापरून यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, तुम्हाला एका सबस्क्राईबला दीडशे रुपये मिळतील, असा संदेश पाठवून आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला संशयिताने ६५० रुपये पाठवून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने आणखी आमिष दाखवत प्रीपेड टास्क वापरण्यास सांगितले.
यावेळी तक्रारदार यांनी आपल्या बँक खात्यावरून आरटीजीएस, एनईएफटी, यूपीए व बायो मोबाईल ॲपमधून वेगवेगळ्या बँक खात्यावर १८ लाख ६ हजार रुपये जमा केले. ही रक्कम कमिशनसह परत देतो, असे सांगून संशयिताने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर कुरणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.