वाहतूककोंडी..वारंवार अपघात; कोल्हापूर शहरात १६ जीवघेणे स्पॉट.. जाणून घ्या

By भीमगोंड देसाई | Updated: September 17, 2025 12:58 IST2025-09-17T12:58:01+5:302025-09-17T12:58:41+5:30

उपाय योजना प्रस्तावित : अधिकारी निश्चित, जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा

16 places in Kolhapur city where accidents and traffic jams occur frequently | वाहतूककोंडी..वारंवार अपघात; कोल्हापूर शहरात १६ जीवघेणे स्पॉट.. जाणून घ्या

छाया-आदित्य वेल्हाळ

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : वारंवार अपघात आणि वाहतूककोंडी होणारे कोल्हापूर शहरात १६ ठिकाण आहेत. परिवहन, पोलिस, महापालिका प्रशासनाने ही ठिकाणे निश्चित केली असून, उपाय योजनाही प्रस्तावित केल्या आहेत. येथील उपाय योजनांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारीही निश्चित केली आहे. शासनाच्या दीडशे दिवसांच्या उपक्रमातर्गंत या १६ ब्लॅक स्पॅाट वाहतूककोंडी मुक्त करण्यावर जिल्हा प्रशासनानेही लक्ष केंद्रीत केले आहे.

शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी आणि अपघाताच्या घटना वाढत आहेत, म्हणून प्रशासनाने वारंवार गंभीर अपघात आणि दिवसांतून अनेकवेळा वाहतूककोंडी होणारी शहरातील १६ ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत. तेथे कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे, त्याचा आराखडाही तयार केला आहे.

ताराराणी चौकात साईड पट्टी वाढवून डांबरीकरण करणे, पोल, युटिलिटी शिफ्ट करणे, डावी बाजू टर्न फ्री करणे, खड्डे भरणे, चौकात पट्टे मारणे, झाडांच्या फांद्या कट करणे, मुक्त सैनिक वसाहत सिग्नल चालू करणे, अतिक्रमण काढणे, तर तावडे हॉटेल चौकात सांगलीकडे जाणारा बसचा स्टॉप बदलणे, पूर्ण चौक डांबरीकरण करणे, अतिक्रमण काढणे, अशा उपाय योजना सूचित केल्या आहेत. 

दाभोळकर चौकात रोड मार्किंग करणे, नो पार्किंग फलक लावणे, व्हिनस चौकात रस्त्यावरील खड्डे भरणे, नो पार्किंग फलक लावणे, पट्टे मारणे, गाडी अड्डा पार्किंग सुरू करणे, रंकाळा बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप काढणे, अतिक्रमण काढणे, रंकाळा टॉवर परिसरात क्रांती मंडळाचा कट्टा काढणे, चौक रोड वन वे करणे, डी मार्ट परिसरात रंकाळा चौपाटी लगतचा फुटपाथ दुचाकी पार्किंगसाठी तयार करणे,

चौपाटी गणेश मंदिर मागील ड्रेनेज ओपन आहे ते बंद करणे, डी मार्टला चुकीच्या दिशेने येऊ नये, असा फलक लावणे, फुलेवाडी पेट्रोल पंपाजवळ डिव्हायडरला रिफ्लेक्टर लावणे, स्पीड ब्रेकरला पट्टे मारणे, क्रशर चौकात साइड पट्टी मोकळे करणे, संभाजीनगर चौकात रोड मार्किंग करणे, डांबरीकरण करणे, साइड पट्ट्या भरणे आणि नंगीवली चौकात इलेक्ट्रिकल डीपी स्थलांतर करणे, वन वे करणे, अशा उपाय योजना प्रस्तावित आहेत.

बिंदू चौकात फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे..

बिंदू चौकातील ब्लॅक स्पॉटवर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे, दोन नंबर शाळेजवळील ट्रान्सफॉर्मर काढणे आणि मिरजकर तिकटी परिसरात अतिक्रमण काढणे, झाडांच्या फांद्या तोडणे, रोड मार्किंग करणे अशा उपाय योजना करण्यात येणार आहे.

शहरातील ब्लॅक स्पॉटची नावे आणि कंसात अंतर असे :

ताराराणी चौक ते तावडे हॉटेल (एक किलोमीटर), दाभोळकर चौक ते ताराराणी चौक (एक किलोमीटर), दाभोळकर चौक ते व्हिनस कॉर्नर (५०० मीटर), रंकाळा बसस्थानक ते डी मार्ट (५०० मीटर), डीमार्ट ते फुलेवाडी फायर स्टेशन (५०० मीटर), फुलेवाडी नाका (५० मीटर), नवीन वाशी नाका ते क्रशर चौक, क्रशर चौक ते जुना वाशी नाका (प्रत्येकी ५०० मीटर), साई मंदिर चौक कळंबा ते आयटीआय कॉलेज, संभाजीनगर चौक ते नंगीवली चौक, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम चौक ते रेणुका मंदिर चौक (प्रत्येकी ५०० मीटर), राजेंद्रनगर ते सुभाषनगर चौक (८०० मीटर), सायबर चौक ते एनसीसी चौक (६०० मीटर), शांतिनीकेतन शाळेजवळ (५०० मीटर), कोयास्को चौक ते केएसबीपी पार्क (एक किलोमीटर).

Web Title: 16 places in Kolhapur city where accidents and traffic jams occur frequently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.