कोल्हापुरात कंटेन्मेंट झोनमधील १५२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:43+5:302021-04-06T04:23:43+5:30
शहरातील कोरोनाचा संसर्ग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत कमी झाला होता. परंतु, संपूर्ण राज्यात संसर्ग वाढू लागला तसा कोल्हापूर ...

कोल्हापुरात कंटेन्मेंट झोनमधील १५२ पॉझिटिव्ह
शहरातील कोरोनाचा संसर्ग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत कमी झाला होता. परंतु, संपूर्ण राज्यात संसर्ग वाढू लागला तसा कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही रुग्ण आढळायला लागले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात रोज शंभर आणि त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून यायला लागले. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली.
याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी माहिती देताना सांगितले की, शहरात नव्याने रुग्ण सापडायला लागल्यापासून सोमवारअखेर ९४ कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. कंटन्मेंट झोनमधील लोकसंख्या २७ हजार ५७९ इतकी असून, त्यापैकी ‘हायरिस्क’मधील सुमारे चार हजार व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील १५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये ९४ पथके काम करीत असून, प्रत्येक पथकात दोन व्यक्तींचा समावेश आहे. ही पथके तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
-सुपर स्प्रेडर’चे स्वॅप घेणार-
रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आम्ही भाजी विक्रेते, फळ विक्रेते (सुपर स्प्रेडर) यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील सर्व भाजी मंडईतील विक्रेत्यांची, तसेच रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्यांचे स्वॅप घेऊन आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. विक्रेत्यांनी या चाचण्यांना सहकार्य करावे, तसेच तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन बलकवडे यांनी केले आहे.
- २०४ कोरोना रुग्णांवर घरातच उपचार-
शहरात ५०० हून अधिक कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २०४ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार सुरू आहेत. ४४ रुग्ण पालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकीचे रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती प्रशासक बलकवडे यांनी दिली.
-उद्याने दिवसा सुरू, रात्री बंद-
महानगरपालिकेची उद्याने दिवसा सुरू राहणार आहेत. रात्री आठ वाजता ती बंद होतील. तरीही उद्यानात गर्दी होत असेल तर ती बंद करण्याचा निर्णय घेण्याची मुभा स्थानिक प्रशासनास देण्यात आलेली आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष अधिकारी नेमण्यात आले आहेत.