१५ बुरुज, एका बुरुजाचे वजन साधारण ३०० किलो, चार मार्ग; कोल्हापूरची ओळख बनलेली स्वागतकमान इतिहासजमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:59 IST2025-11-07T11:58:34+5:302025-11-07T11:59:11+5:30
धोकादायक बनल्याने घेतला पाडण्याचा निर्णय

१५ बुरुज, एका बुरुजाचे वजन साधारण ३०० किलो, चार मार्ग; कोल्हापूरची ओळख बनलेली स्वागतकमान इतिहासजमा
Kolhapur News: ‘स्वच्छ सुंदर कोल्हापूर’चा नारा देणाऱ्या तत्कालीन महापौर स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या कारकिर्दीत शहर सौंदर्यीकरणाचे अनेक उपक्रम राबविले. या कामात त्यांनी अनेक उद्योजक, व्यावसायिकांना सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नोव्हेंबर १९९७ मध्ये कोल्हापूरच्या पूर्व प्रवेशद्वारावर ही स्वागत कमान उभारण्यात आली.
महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी दिलीप मंडलिक यांनी निवृत्ती घेऊन होर्डिंग्ज व्यवसायात पदार्पण केल्यानंतर त्यांनी कमानीची उभारणी केली. स्वागत कमान संबंधित उद्योजक, व्यावसायिकाने स्वखर्चातून बांधायची आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी कमानीवर जाहिराती कराव्यात असा करार झाला होता.
वाचा- २८ वर्षांची ४३ फुटी उंच कमान दीड तासांतच जमीनदोस्त; कोल्हापूरच्या ‘स्वागत’ कमानीला अखेरचा ‘निरोप’
भारती एस्पो ॲड कंपनीच्या वतीने गोव्याचे तरुण बांधकाम व्यावसायिक विजय चिकणे यांनी कमानीचे बांधकाम केले. या कमानीतून शहरात येण्यासाठी दोन तर बाहेर जाण्यासाठी दोन असे चार मार्ग ठेवण्यात आले. जमिनीपासून बुरुजापर्यंतची कमानीची उंची ४३ फूट इतकी होती.
शहराच्या प्रमुख रस्त्यावर कमान उभारली जाणार असल्याने तिचे बांधकामही अधिक मजबूत व सुरक्षित व्हावे म्हणून या कमानीसाठी प्रत्येकी ७० बाय १० फुटांची रिंग टाकून तसेच जमिनीखाली दहा फूट खोलीपासून पाच पिलर उभे केले होते.
कमानीवर आडवे बिम टाकून त्यावर १५ बुरुज उभे करण्यात आले होते. एका बुरुजाचे वजन साधारणपणे ३०० किलो होते आणि ते क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात आले होते.
कमानीचे काम तब्बल वर्षभर चालले. त्यासाठी चांगल्या दर्जाची सळी, सिमेंट, दगड यांचा वापर केला असा दावा केला जातो. त्यावर विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. पुण्या-मुंबईहून आल्यानंतर तावडे हॉटेलजवळ वाहन आले आणि समोर कमान दिसली की कोल्हापूर आल्याची जाणीव प्रवाशी, पर्यटक, भाविकांना होत असे. कमानीचे अनावरण माजी आमदार महादेवराव महाडिक, तत्कालीन महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थित करण्यात आले.
ही कमान म्हणचे कोल्हापूरची ओळख होती. परंतु अलीकडील पाच वर्षात दिलीप मंडलिक यांच्याकडून ती काढून घेण्यात आल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच ती धोकादायक बनली. गुरुवारी रात्री ती जमीनदोस्त करण्यात आली. तावडे हॉटेलची जशी ओळख पुसली गेली तसा या कमानीचा २८ वर्षाचा इतिहास पुसला गेला.