कोल्हापुरात शेंडा पार्कमधील जागांची १४ कार्यालयांनी केली मागणी; परिसरातील जागा, प्लॅटचे दर वाढले 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 20, 2025 17:35 IST2025-08-20T17:31:22+5:302025-08-20T17:35:06+5:30

जिल्हा प्रशासनाकडे पत्र 

14 offices demand land in Shenda Park in Kolhapur Land and plot prices in the area have increased | कोल्हापुरात शेंडा पार्कमधील जागांची १४ कार्यालयांनी केली मागणी; परिसरातील जागा, प्लॅटचे दर वाढले 

संग्रहित छाया

इंदुमती गणेश

कोल्हापूर : शासकीय कार्यालयासाठी जागा मिळावी यासाठी जिल्ह्यातील विविध १४ कार्यालयांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी पत्र पाठवले आहे. त्यापैकी सध्या तरी आयटी पार्क, क्रीडा संकुल, समाज कल्याण, महिला बालकल्याण अशा काही महत्त्वाच्या कार्यालयांसाठी येथील जागा मिळू शकते. मात्र, येथे सर्किट बेंचसह मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये होत असल्याने परिसरातील जागांचे व फ्लॅटचे दर मात्र दुपटीने वाढले आहेत.

शेंडा पार्क परिसरात ५३७ एकर जागा उपलब्ध असून, त्यापैकी २१७ एकरांसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यातील सर्किट बेंच, प्रशासकीय इमारत आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू झाले आहे. अन्य प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी अन्य १४ कार्यालयांनी जागा मागणीचे पत्र जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे. येथे शासकीय कार्यालये होत असल्याने तसेच मागील वर्षभर सर्किट बेंचची चर्चा असल्याने या निर्णयाच्या आधीपासूनच जागा मालकांनी दर वाढवले आहेत. 

दर ४ ते ५ हजारांवर

कोरोनापूर्वी व त्यानंतरही वर्षभर येथील जागांचे दर १५०० रुपये चौरस फूट होते. येथे विविध कार्यालये होणार याची चर्चा सुरू झाल्यावर दर ३ हजारावर गेला. आता सर्किट बेंचच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हापासून तर जागा कोणत्या लोकेशनला आहे, त्यानुसार ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत जागेचा दर गेला आहे.

जागेची मागणी केलेली कार्यालये

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, उपनियंत्रक वैधमापन, सहायक कामगार आयुक्त, जिल्हा महिला बालकल्याण कार्यालय, महापालिका, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, आयुक्त महिला व बालविकास विभाग, पुणे, सहायक आयुक्त समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग.

प्रशासकीय इमारतीत ४२ कार्यालये

येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असून, येथे तब्बल ४२ कार्यालये होणार आहेत. यामध्ये साखर सहसंचालक, नगररचना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कामगार विमा योजना देवा दवाखाना, करवीर कृषी अधिकारी, भूमी संपादन, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, अन्न औषध प्रशासन, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रेशीम कार्यालय, कृषी, शासकीय धान्य गोदाम, उपसंचालक भूविज्ञान व खनिकर्म, लेखापरीक्षक, माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ अशा विविध कार्यालयांचा समावेश आहे.

शेंडा पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यालये होत असल्याने आणि मागील वर्षभरापासून सर्किट बेंचच्या हालचाली सुरू असल्याने येथील जागांचे दर वाढले आहेत. भोवताली रहिवासी परिसर असल्याने जागा मर्यादित आहे. त्यामुळे दरही वाढले आहे. - के. पी. खोत, क्रिडाई कोल्हापूर.

Web Title: 14 offices demand land in Shenda Park in Kolhapur Land and plot prices in the area have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.