जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली,पंचगंगा २१.०५ फुटांवर : पावसाचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:23 IST2020-07-08T14:24:05+5:302020-07-08T16:23:01+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, आजरा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रांतही धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २१. ०५ फुटांपर्यंत गेली असून, जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे दिवसभरात बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली,पंचगंगा २१.०५ फुटांवर : पावसाचा जोर वाढला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस कोसळत असून गगनबावडा, आजरा, चंदगड व राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रांतही धुवाधार पाऊस असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २१.५ फुटांवर पोहोचली असून, जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.
गेले दोन दिवस कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून, मंगळवारी (दि. ७) रात्रीपासून त्यात वाढ होत गेली. बुधवारी सकाळीही जोरदार पाऊस कोसळत राहिला. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाला असून सरासरी ११० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातून अद्याप प्रतिसेकंद ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र छोटे-मोठे ओढे-नाले ओसंडून वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २१.५ फुटांवर पोहोचली असून तब्बल २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रतिसेकंद ११ हजार घनफूट वेगाने पाणी नदीपात्रात येत असल्याने परिसरातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे.
धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने दक्षता म्हणून धरणांसह लघुपाटबंधाऱ्यांतून विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला तर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
कुंभी, कासारी, भोगावती या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शिवारांत पसरू लागले आहे. पंचगंगेची पातळी तासाला दोन इंचांनी वाढत असून तिचा पाणी वाढण्याचा वेग असाच राहिला तर पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.
आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली
संततधार पडणाऱ्या पावसाने आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावर पाणी आल्याने पोलीस खात्याने दोन्ही बाजूने बॅरीकेटस लावून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. पाण्यामुळे साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडीसह या मार्गावरील वाहतूक सोहाळे, सुतगिरणीमार्गे सुरु करणेत आली आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण व गगनबावडा तालुक्यातील कोदे लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घटप्रभाची क्षमता १.५६, तर कोदेची ०.२१ टीएमसी आहे.