अपयशाच्या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. मोरेवाडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 20:13 IST2023-02-28T20:12:50+5:302023-02-28T20:13:22+5:30
अभ्यासात हुशार असलेल्या मुलीने अनपेक्षितपणे आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना धक्का बसला.

अपयशाच्या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. मोरेवाडीतील घटना
उद्धव गोडसे
कोल्हापूर : बारावीचे तीन पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लिया अमित रुकडीकर (१७, रा. कोरेनगर, मोरेवाडी, ता. करवीर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिया रुकडीकर ही शहरातील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. बोर्डाची परीक्षा सुरू असून, झालेले तीनही पेपर अवघड गेल्याने ती अस्वस्थ होती. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आई आणि वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तिने घरातील छताच्या फॅनला दोरीने गळफास घेतला. घरात असलेल्या आजीला हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलवले. शेजाऱ्यांनी गळफास सोडवून तिला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
लिया हिचे वडील शिवणकाम करतात. आई शिक्षिका आहे. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीने अनपेक्षितपणे आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना धक्का बसला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
नापास झाले तरी पुन्हा परीक्षा देता येते. कमी गुण मिळाल्यानंतर पुन्हा सुधारणा करता येते. पण, एकदा जीव गेल्यानंतर पुन्हा आयुष्य मिळत नाही. ऐन उमेदीच्या वयात जगण्याचा आनंद घेण्याऐवजी तणाव आणि नकारात्मक मानसिकतेतून आत्महत्या करणे हा पळपुटेपणा असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. परीक्षा काळात तणाव घेऊ नका, तर आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.