Kolhapur: पन्हाळ्यातील अकृषक आकारणीचे ११९ बोगस दाखले रद्द, चौकशीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:19 IST2025-02-20T12:19:03+5:302025-02-20T12:19:29+5:30
कोल्हापूर : खोटी कागदपत्रे तयार करून केलेले अकृषक आकारणीचे तब्बल ११९ बोगस दाखले पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी ...

संग्रहित छाया
कोल्हापूर : खोटी कागदपत्रे तयार करून केलेले अकृषक आकारणीचे तब्बल ११९ बोगस दाखले पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी रद्द केले आहेत. गावठाण हद्दीपासून २०० मीटर क्षेत्रातील १३० दाखल्यांपैकी ६४ दाखले भूमिअभिलेख कार्यालयाने दिलेलेच नाहीत. १० दाखल्यांमध्ये गाव नकाशात गट नंबर दिसत नाही. खोट्या सह्या करून मिळवलेले ४५ दाखले रद्द केले आहेत. या आदेशाची संबंधितांच्या सातबारा पत्रकी नोंद करण्यात आली आहे. आता हे खोटे दाखले दिले कुणी, त्याचे काही रॅकेट आहे का आणि अन्य तालुक्यांतही असे दाखले दिले गेले आहेत का, याची चौकशी होण्याची गरज आहे.
माले (ता. पन्हाळा) येथील सुहास बाबूराव पाटील यांनी ५ ऑगस्ट २०२३ रोजी विभागीय आयुक्तांकडे तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांची कार्यालयीन चौकशी व्हावी असा तक्रार अर्ज दिला होता. त्यातून हा प्रकार उघडकीस आला. तहसीलदार शिंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ३० जानेवारीला पाठविलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
बहुतांशी प्रकरणात नागरिकांनी गावठाण हद्दीपासून २०० मीटर परीघ व झोनचे खोटे दाखले सादर करून अकृषक आकारणी दाखला मिळवला आहे.
चलनाची रक्कम भरल्यानंतर कार्यालयाकडून दाखले देण्यात आले. त्यांची रजिस्टर नोंद ठेवली गेली. तक्रार अर्जानंतर तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या काळात दिल्या गेलेल्या सर्वच दाखल्यांची पडताळणी केली. यात काही अर्जदारांनी खोटे दाखले दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते रद्द करून त्यांची नाेंद संबंधित गटाच्या सातबारा पत्रकी घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे तहसील कार्यालयाकडे अर्ज दाखल करून अकृषक आकारणी दाखला घेण्यासाठी अर्जदारांनी शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणात शेंडगे यांना दोषी धरू नये व तक्रारदाराने त्यांच्या चौकशीचा केलेला अर्ज निकाली काढावा असा अहवाल तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे.
कार्यालय : पडताळणीसाठी पाठवलेले अर्ज : कार्यालयाने दिलेले दाखले : कार्यालयाने न दिलेले दाखले : रद्द केलेले अर्ज
उपअधीक्षक भूमिअभिलेख : १३० : ५६ : ७४ : ६४
सहायक संचालक नगररचना शाखा कोल्हापूर : ५२ : ०७ : ४५ : ४५
एकूण : १८२ : ६३ : ११९ : १०९
(१० प्रकरणात गाव नकाशात गट नंबर दिसत नाही.)