Kolhapur: फुटबॉल खेळताय की किक बॉक्सिंग; यंदा हंगामात १०५ रेड कार्ड, ३५० यलो

By सचिन यादव | Updated: June 10, 2025 18:10 IST2025-06-10T18:08:44+5:302025-06-10T18:10:04+5:30

खेळाडू, समर्थकांच्या बेशिस्तपणाने केएसए, संयोजक हतबल

105 red cards, 350 yellow cards in Kolhapur football season | Kolhapur: फुटबॉल खेळताय की किक बॉक्सिंग; यंदा हंगामात १०५ रेड कार्ड, ३५० यलो

संग्रहित छाया

सचिन यादव

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉलचा हंगाम यंदा संपला. यामध्ये खेळाडूंनी बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी तब्बल १०५ रेड कार्ड आणि ३५० यलो कार्ड दाखविले. काही सामन्यांत खेळाडूंनी बेशिस्त वर्तन केल्याचे समोर आले. सामन्यात अनेकदा हाताबाहेर परिस्थिती गेल्याने संघ व्यवस्थापक आणि सामना संयोजक हतबल झाले. हंगामात डिसेंबरपासून सुरू झालेल्या या हंगामात ६० लिग सामने झाले.

कोल्हापूर आणि फुटबॉलचे वेगळे समीकरण आहे. फुटबॉल संघात शहरातील प्रत्येक पेठेतील खेळाडू आहेत. प्रत्येकाचा संघ वेगळा आहे. सामन्याच्या वेळी श्री शाहू स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होते. कोल्हापूरला ‘फुटबॉलची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. यंदाच्या हंगामात चार लाखांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजेरी लावली.

संयोजकही हतबल

खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी फुटबॉल चषक भरविला. विजेत्या संघाला दीड लाख रुपये आणि उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. काही सामन्यांतील हुल्लडबाजी रोखण्यात संयोजक अपयशी ठरले. अनेकदा खेळाडूंनी आणि समर्थकांनी मैदानावर हुल्लडबाजी केली. मारहाण, चप्पल फेक, बाटली फेक, अर्वाच्य शिवीगाळ, पंचाच्या अंगावर धावून जाणे, यांसारखे प्रकार घडले.

गुन्हा दाखल नाही

सामन्यात मारामारीचे प्रकार घडले. संयोजकांच्या मंडपात जाऊन घुसून समर्थकांना मारहाण झाली. मात्र, याप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्याबाबची तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, तर काही घटनांत पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केलेला नाही. काही घटनांत पोलिसांनी समर्थकांवर लाठीमार केला.

लिग आणि नॉकआऊट सामने

हंगामात श्री शाहू छत्रपती कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन (केएसए) लिग, सतेज चषक फुटबॉल स्पर्धा, उत्तरेश्वर चषक फुटबॉल, अटल चषक, तोडकर चषक, शारंगधर चषक सामने झाले. सहा लिग आणि नॉक आऊट सामन्यात पंचांनी ही कारवाई केली. पंचानी खेळाडूंवर तातडीने कारवाई केल्याने फुटबॉलप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले. हुल्लडबाजी करणाऱ्या संघावर सामन्यांना बंदी, दंडात्मक कारवाई केली. तिकीट विक्रीतून मिळालेल्या रकमेतून हा दंड वसूल केला.

फुटबॉल सामन्यात खेळाडूंचे गैरवर्तनाचे प्रकार सुरू आहेत. पेठापेठांतील इर्ष्याचा राग अनेकदा खेळाडू मैदानावर काढतात. केएसएने यंदा कठोर कारवाई केली. मात्र, मारामारी, दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. - युवराज साळोखे, फुटबॉलप्रेमी

Web Title: 105 red cards, 350 yellow cards in Kolhapur football season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.