१०० कोटींचा उपयोग काय ? कोल्हापुरातील रस्त्यांची कामे रखडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:40 IST2024-05-04T16:39:46+5:302024-05-04T16:40:00+5:30
ताकीद देऊनही ठेकेदाराची बेपर्वाई : १५ मे पूर्वी पाच रस्ते पूर्ण होणे अशक्य

संग्रहित छाया
कोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटी निधीतून सोळा रस्ते करायचे आहेत. त्यातील प्रमुख पाच रस्ते दोन्ही बाजूच्या गटारींसह १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधीने दिले. आश्वासन देऊन महिना होत आला तरी कामांना अजून सुरुवात केलेली नाही. त्यामुळे पाचही रस्ते १५ मे पूर्वी होणे अशक्य आहे. या रस्त्यांच्या अर्धवट कामांचा त्रास मात्र शहरवासीयांना होऊ लागला आहे.
गेले वर्षभर १०० कोटींच्या सोळा रस्त्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गाजावाजा करून रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या गोष्टीलाही आता साडेतीन महिने होऊन गेले. रस्त्यांची कामे दर्जेदार करा, वेळेत करा, अशी सक्त ताकीद त्यावेळी पालकमंत्र्यांसह नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली होती.
रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाल्यानंतर ठेकेदाराने प्रमुख पाच रस्ते प्राधान्याने करण्याचे ठरवून तेथील कामांना सुरुवात केली. परंतु सेवावाहिन्यांचे स्थलांतर, रस्ते रुंदीकरणातील अडथळे, नवीन जलवाहिन्यांची कामे, ड्रेनेज लाईनची कामे यांची कारणे देत ठेकेदाराने कामे करण्यास विलंब केला. काही ठिकाणी खुदाई तर काही ठिकाणी रस्त्यावर खडी आणून टाकली. परंतु कामे काही प्रगतिपथावर गेलेली नाहीत.
कामे रेंगाळल्यामुळे शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खराब रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांची हाडे मोडायची वेळ आली आहे. याबाबत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने ठेकेदाराबरोबर एक बैठक आयोजित करण्यास भाग पाडले. १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत ठेकेदाराच्या प्रतिनिधीला चांगलेच फैलावर घेत कामातील दिरंगाईबद्दल जाब विचारला. त्यावेळी मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी ते संभाजीनगर पेट्रोलपंप या मुख्य रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण येत्या दोन दिवसात चालू करून बाजूच्या गटारीसह १५ मे पर्यंत पूर्ण करणार, त्याचबरोबर चार रस्त्यांचेही काम याचबरोबर पूर्ण करणार, यामध्ये मंगळवार पेठेतील नागरिकांची कोणतीही फसवणूक करणार नाही, असे आश्वासन शहर अभियंता सरनोबत व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींच्या वतीने कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. महिना होत आला तरी कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे १५ मे पूर्वी कामे होणे अशक्य आहे. आधीच खराब झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना पावसाळ्यात अपघातांना सामोरे जावे लागणार आहे.
नागरिक धुळीने बेजार
रस्त्यांची कामे अर्धवट राहिल्याने या रस्त्यावरून जाताना नागरिकांना धुळीचा त्रास होऊ लागला आहे. एखादे अवजड वाहन जात असेल तर रस्त्यावरील धूळ प्रचंड प्रमाणात उठते आणि त्यातून दुचाकीस्वारांना ही धूळ नाकातोंडात घेऊन जावे लागत आहे. तसेच रस्त्यावर टाकलेली खडी उचकटली असल्याने त्यावरून वाहने घसरण्याचा धोकाही वाढला आहे.
- सोळा रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी
- रहदारी असणाऱ्या सोळा रस्त्यांच्या निविदा
- रस्ते करण्यासाठी दीड वर्षाची मुदत
रस्त्यांच्या कामाबाबत गुरुवारी बैठक झाली आहे. ठेकेदाराने दिलेल्या बारचार्ट प्रमाणे कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे कामाची गती वाढवा आणि दिलेल्या मुदतीत पाच रस्त्याची कामे पूर्ण करा, अशी सूचना दिली आहे. -नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.