Kolhapur: जादा परताव्याचे आमिष, प्रियांश कन्सलटन्सीचा १ कोटी ३७ लाखांचा गंडा; एकास अटक
By उद्धव गोडसे | Updated: February 29, 2024 13:03 IST2024-02-29T13:01:32+5:302024-02-29T13:03:08+5:30
सुरुवातीचे काही महिने परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे थांबले.

Kolhapur: जादा परताव्याचे आमिष, प्रियांश कन्सलटन्सीचा १ कोटी ३७ लाखांचा गंडा; एकास अटक
कोल्हापूर : शाहूपुरी येथील पाच बंगला परिसरातील प्रियांश कन्सलटन्सी या कंपनीने गुंतवणुकीवर पाच ते १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत संग्राम शिवाजी पाटील (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी बुधवारी (दि. २८) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कंपनीचे प्रमुख प्रमोद आनंदा कांबळे आणि प्रवीण आनंदा कांबळे (दोघे रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव, ता. करवीर) या दोघा भावांवर गुन्हा दाखल झाला. यातील प्रवीण कांबळे याला पोलिसांनी अटक केली.
पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रियांश कन्सलटन्सी या कंपनीचे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. स्टॅम्प पेपरवर करारपत्र करून परतावा देण्याची हमी दिली. त्यानुसार फिर्यादी पाटील यांच्यासह शेकडो गुंतवणूकदारांनी डिसेंबर २०२० पासून कंपनीत पैसे भरले.
सुरुवातीचे काही महिने परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे थांबले. गुंतवणूकदारांनी वारंवार कंपनीच्या प्रमुखांकडे पाठपुरावा करूनही परतावे मिळाले नाहीत, तसेच मुद्दलही मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन कंपनीच्या विरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी तातडीने कंपनीचा प्रमुख प्रवीण कांबळे याला अटक केली असून, त्याच्या भावाचा शोध सुरू आहे. अटकेतील संशयिताच्या चौकशीतून फसवणुकीची व्याप्ती समोर येईल, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली. न्यायालयात हजर केले असता, अटकेतील कांबळे याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.