बदलापूर : रिक्षाचालकाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बिअर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर तिच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला. पोलिसांनी अवघ्या बारा तासांत खरवई परिसरातून रिक्षाचालकाला अटक केली.
पीडित तरुणी ही मुंबईत राहणारी आहे. ती २१ डिसेंबर रोजी बदलापूरला मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी त्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतले आणि या तिघांनी मद्यपान केले. त्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ताने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित शुद्धीत आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी तिने २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कपाटात बसला लपून
पोलिस रिक्षाचालकाला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस तो बहिणीच्या घरात एका कपाटात लपला होता. पोलिसांनी त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या.
त्याच्या मैत्रिणीलाही अटक केल्याचे बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.