होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:23 IST2021-04-28T23:23:00+5:302021-04-28T23:23:06+5:30
केडीएमसी परिसर : दररोज जमा होतो ७५० किलो कोविड कचरा

होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे?
मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या घरातील कचरा घेण्यासाठी महापालिकेकडून गाडी पाठविली जाते. त्यांचा कचरा स्वतंत्ररीत्या गोळा केला जातो. तो अन्य कचऱ्यात मिसळू दिला जात नाही. शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट उंबर्डे येथील जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात लावली जाते.
महापालिका हद्दीत ३०८ खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी महापालिकेची सात कोविड रुग्णालये आहेत. खासगी कोविड रुग्णालयांची संख्या ९० आहे. खासगी कोविड रुग्णालयांतून तयार होणारा कचरा महापालिका स्वतंत्ररीत्या गोळा करते. दिवसाला जवळपास ७५० किलो कोविड कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावली जाते. सुरुवातीला मास्क हे यूज ॲण्ड थ्रो स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यांचा खच डंपिंगवरील कचऱ्यात मिळून येत होता.
आता अनेक लोक यूज ॲण्ड थ्रो ऐवजी कापडी मास्क वापरत आहेत. जो स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता येतो. त्यामुळे मास्कचाही कचरा कमी होत आहे. त्याचबरोबर जैववैद्यकीय कचरा हा कुठेही रस्त्यावर उघड्यावर टाकणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने गुन्हे दाखल करून दंड वसुली सुरू केली आहे. त्यामुळे उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होत आहे.
कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का?
कोरोनाबाधिताने वापरलेले मास्क, वस्तू यांच्या स्वरूपातील कचरा आणि दैनंदिन गोळा होणारा कचरा एकत्रित गोळा केल्यास त्यातून कोरोना पसरू शकतो. मात्र, केवळ कचऱ्यातून कोरोना पसरू शकत नाही.
nमहापालिका होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या घरी गाडी पाठविते. त्यांच्या घरातून निर्माण होणारा कचरा वेगळ्या प्रकारे गोळा करून तो प्रक्रियेसाठी उंबर्डे येथील जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठविला जातो.
nत्याचबरोबर जैववैद्यकीय कचरा उघड्यावर
टाकल्याप्रकरणी आतापर्यंत तीन रुग्णालयांच्या विरोधात पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून किमान १० हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली. त्यामुळे कचरा कुणीही उघड्यावर टाकू नये असे ते म्हणाले.