पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:52 IST2025-07-06T18:52:37+5:302025-07-06T18:52:37+5:30
आषाढी एकादशीनिमित्त कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची भव्य ज्ञान दिंडी

पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कल्याण : मी नुकताच पंढरपूरला जाऊन आलो. तिथे व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे आता सर्व सामान्य वारकऱ्यांना फक्त पाच तासात दर्शन मिळत असल्याने सर्वजण आनंदात आहेत. मी देखील रांगेत उभा राहून दर्शन घेतले. आमचे सर्व कार्यकर्ते नियमांचे पालन करत आहेत. पंढरपूरच्या मंदिर समितीने आणि महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे की, पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे माध्यमांशी बोलताना केले.
आषाढी एकादशीनिमित्त कल्याणमध्ये आज एक आगळीवेगळी ज्ञान दिंडी काढण्यात आली. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून दिंडीला हिरवा झेंडा दाखवत तिचा शुभारंभ केला. कल्याण चॅरिटी ट्रस्टच्या वतीने बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञान दिंडी'त सहभागी होऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संवाद साधला. बिर्ला स्कूल आणि बिर्ला कॉलेजच्या हजारो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत, टाळ, मृदुंग, ढोलकीच्या गजरात विठ्ठलनामात तल्लीन होत सहभाग घेतला. ही दिंडी बिर्ला कॉलेजपासून शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत मार्गक्रमण करत होती. यामध्ये सेंचुरी रेयॉन परिवाराने पुढाकार घेतला. संपूर्ण मार्गावर ‘ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल विठ्ठल’ चा जयघोष घुमत होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेली विठ्ठलभक्तीची झलक उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भावून गेली.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह बिर्ला महाविद्यालय आणि कल्याण चॅरिटी ट्रस्टचे पदाधिकारी आणि विद्यार्थी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.