म्हात्रे, वाळेकर यांच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारले; दोन्ही कुटुंबातील पाच उमेदवारांचा झाला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:36 IST2025-12-22T09:36:22+5:302025-12-22T09:36:42+5:30
एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्यामुळे बदलापुरात म्हात्रे यांच्या घराणेशाहीची चर्चा रंगली होती.

म्हात्रे, वाळेकर यांच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारले; दोन्ही कुटुंबातील पाच उमेदवारांचा झाला पराभव
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना जोरदार धक्का बसला. कुटुंबातल्या सहा सदस्यांना सोबत घेऊन लढणारे वामन म्हात्रे काठावर पास झाले असले तरी कुटुंबातल्या तीन सदस्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबातील दोन सदस्यांना पराभवाचा झटका बसला.
बदलापुरात वामन म्हात्रे स्वतः नगरसेवकपदासाठी उमेदवार होते, तर त्यांची पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांच्याच कुटुंबातील वामन म्हात्रे यांचा मुलगा वरुण म्हात्रे, पुतण्या भावेश म्हात्रे या निवडणुकीत पराभूत झाले. वामन म्हात्रे यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे आणि त्यांच्या भावजय उषा म्हात्रे
विजयी झाल्या.
एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्यामुळे बदलापुरात म्हात्रे यांच्या घराणेशाहीची चर्चा रंगली होती. बदलापूरकरांनी म्हात्रे यांच्या घराणेशाहीला नाकारले. अशीच काहीशी परिस्थिती अंबरनाथमध्ये दिसून आली. वाळेकर कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांचा आणि त्यांचा मुलगा निखिल वाळेकर यांचा पराभव झाला.