भाजपचं मिशन 'कल्याण', केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर लोकसभा मतदारसंघात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 17:23 IST2022-09-05T17:22:07+5:302022-09-05T17:23:03+5:30
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, शासकीय अधिकाऱ्यांसमवेत घेणार बैठक

भाजपचं मिशन 'कल्याण', केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर लोकसभा मतदारसंघात येणार
डोंबिवली: देशातील आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे मिशन ४०० प्लस हे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात (विशेषतः जेथे सध्या भाजपचे खासदार नाहीत अशा लोकसभा मतदारसंघात) केंद्रीय मंत्र्यांचे दौरे होणार आहेत. त्या निमित्ताने कल्याण लोकसभेमध्येदेखील केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री, युवा व्यवहार क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे ११ ते १३ सप्टेंबर या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारमण या पुणे दौऱ्यावर असून त्यांना मिशन बारामती देण्यात आलं आहे. तर, ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये पक्ष संघटनेच्या वाढीसह आढावा घेण्यासाठी अनुराग ठाकूर प्रवास करणार असल्याची माहिती भाजपचे कल्याण जिल्हाद्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सोमवारी दिली. त्या तीन दिवसांमध्ये ते पक्षाच्या बैठकांसहित विविध मतदारसंघातील विविध घटकांमधील प्रतिष्ठितांसह काही विशेष भेटीगाठी घेणार आहेत. तसेच शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, बैठका घेणार आहेत असेही कांबळे म्हणाले.