उल्हासनगर लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा जास्त? तरीही पाणी टंचाई कशी? आयुक्तांचे कारवाईचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:40 IST2025-04-11T17:40:20+5:302025-04-11T17:40:29+5:30
उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

उल्हासनगर लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा जास्त? तरीही पाणी टंचाई कशी? आयुक्तांचे कारवाईचे संकेत
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत एमआयडीसी कडून जास्तीचा पाणी पुरवठा जास्त होऊनही पाणी टंचाई कशी? असा प्रश्न आयुक्तानी अधिकाऱ्यांना केला. पाण्याचे वितरण समसमान होण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणी चोरट्यावर कारवाईचे संकेत दिल्याने, पाणी चोरांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. लोकसंख्येच्या प्रमाणात ९० टक्के एमएलडी पाणी पुरेसे असताना शहराला जास्तीचा पाणी पुरवठा होतो. तरीही शहरांत पाणी टंचाई निर्माण झालीच कशी? असा प्रश्न आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारला आहे. सुभाष टेकडी, मराठा सेकशन, महादेवनगर, गायकवाड पाडा, तानाजीनगर आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊन राजकीय नेते व माजी नगरसेवकांनी महापालिकेला निवेदन देवून कारवाईची मागणी केली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पंपिंग स्टेशन, जलवाहिनी आदीची पाहणी करून अवैध नळ lजोडणीवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.
पाणीगळतीवर कोट्यावधीचा खर्च
महापालिका पाणी गळतीवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणी गळती कायम आहे. त्या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
यापूर्वी शहरात पाणी पुरवठा टंचाई निर्माण झाल्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. त्यानंतर ३५० कोटीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली असून योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०३ कोटीतून कामे सुरु झाली. तरीही शहरात पाणी टंचाई निर्माण होऊन श्वेतपत्रिका काढण्याची मागणी होत आहे.
खेमानी परिसरात तलावाचे स्वरूप
शहरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असताना खेमानी टेकडी परिसरात रस्त्याहून पाणी वाहत आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याची टीका स्थानिक प्रा. प्रवीण माळवे यांनी केला.