उल्हासनगर भाजपाच्या तोफेला निवडणूक प्रचार प्रमुख, निष्ठावंतात उत्साह तर शिंदेसेना सतर्क
By सदानंद नाईक | Updated: November 7, 2025 15:33 IST2025-11-07T15:32:21+5:302025-11-07T15:33:08+5:30
उल्हासनगर शिवसेने विरोधात बिनधास्त भिडणारे नेते म्हणून प्रदीप रामचंदानी यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे त्यांना शहरजिल्हाध्यक्ष पद मिळाले होते.

उल्हासनगर भाजपाच्या तोफेला निवडणूक प्रचार प्रमुख, निष्ठावंतात उत्साह तर शिंदेसेना सतर्क
- सदानंद नाईक
उल्हासनगर : पूर्वश्रमीचे कलानी समर्थक राजेश वधारिया यांची भाजपा शहरजिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, पक्षातील निष्ठावंत गटात निर्माण झालेली अस्वस्थता प्रदीप रामचंदानी यांनी निवडणूक प्रचार प्रमुख पदी निवड झाल्याने काहीशी दूर झाल्याचे चित्र आहे. तसेच पक्षाची तोफ म्हणून ओळख असलेले रामचंदानी यांच्या नियुक्तीने शिंदेसेना सतर्क झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर शिवसेने विरोधात बिनधास्त भिडणारे नेते म्हणून प्रदीप रामचंदानी यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे त्यांना शहरजिल्हाध्यक्ष पद मिळाले होते. त्यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर एकेकाळी कलानी यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश वधारिया यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली. वधारिया यांच्यासह अन्य पक्षातून भाजपवासीय झालेले नेते व भाजपचे निष्ठावंत नेते असे दोन गट पक्षात पडल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर व निवड समिती सदस्य पदाचा रामचंदानी यांच्यासह अन्य जणांनी राजीनामा दिल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. निष्ठावंत गटाचा विरोध बघून प्रदीप रामचंदानी यांच्या गळ्यात निवडणूक प्रमुख पदाची माळ टाकल्याचेही बोलले जाते.
बिनधास्त स्वभावामुळे निवड
प्रदीप रामचंदानी हे शिंदेसेनेविरोधात अत्यंत बिनधास्त आणि थेटपणे बोलतात. पक्षातील सूत्रांनुसार, त्यांची हीच निर्भीड वृत्ती हेरून त्यांना प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. यामुळे भाजपला केवळ निष्ठावंत गटाचा पाठिंबाच नाही, तर शिंदेसेनेच्या कारभारावर सडेतोड टीका करणारी एक धारदार तोफ निवडणुकीच्या रिंगणात मिळाली आहे.
निष्ठावंत गटात आनंदाचे वातावरण
पक्षातील तणावाच्या वातावरणात रामचंदानी यांची प्रचार प्रमुखपदी निवड म्हणजे निष्ठावंत गटाला दिलेला दिलासा आणि पक्षातील संतुलन राखण्याचा प्रयत्न मानला जात आहे. रामचंदानी यांच्या निवडीने निष्ठावंत गटात आनंद आहे.
भाजपाच्या महिला अध्यक्षपदी मंगला चांडा
शहर भाजपा महिला कार्यकारणी घोषित होऊन, अध्यक्ष पदी मंगला चांडा यांची निवड झाली. पक्षात सक्रिय व नागरिकाच्या संपर्कात राहणाऱ्या महिला नेत्यांची निवड महिला शहराध्यक्ष पदी व्हायला हवी. असे दबक्या आवाजात बोलले जात आहे.