UP STF Action: उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी भिवंडीत मोठी कारवाई केली. यूपी एटीएफने छापेमारी करत भिवंडीच्या विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे तीन लाख रुपये गोळा करून ती रक्कम पॅलेस्टाईनला पाठवल्याचा आरोप आहे. भिवंडीमध्ये सातत्याने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. मात्र उत्तर प्रदेशातील दहशतवादी पथकाने येऊन ही कारवाई केल्याने त्याची चर्चा सुरु झालीय. या कारवाईनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२ राहणार ताहेरा मॅरेज हॉलजवळील सहारा अपार्टमेंट), अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (२२ गुलजार नगर)आणि जैद नोतियार अब्दुल कादिर (२२ वेताळ पाडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, तिन्ही आरोपींनी पॅलेस्टिनींसाठी सुमारे ३ लाख रुपये गोळा केले होते आणि ते पैसे उत्तर प्रदेशातील त्यांच्या साथीदारांकडे पाठवले होते. नंतर ते परवानगीशिवाय परदेशात पाठवण्यात आले.
पुढील चौकशीसाठी उत्तर प्रदेशात पाठवण्यापूर्वी आरोपींची शांती नगर पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. निजामपुरा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारीही या कारवाईमध्ये सहभागी झाले. २७ ऑगस्ट रोजी यूपी एटीएसने दहशतवादविरोधी आणि परदेशी निधी कायद्याच्या संबंधित कलमांचा वापर करून तपास नोंदवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही कारवाई परदेशात मदत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर आर्थिक नेटवर्कवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडून दक्षता वाढवण्याची गरज असल्याचे दर्शवते असं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यूपी एटीएस शुक्रवारपासून तिन्ही आरोपींच्या मागावर होते. शनिवारी दुपारी अबू सुफियानला गुलजार नगरमधील एका फ्लॅटमधून अटक करून ही कारवाई पूर्ण झाली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर, एटीएसने भिवंडी पोलिसांशी समन्वय साधून जैद अब्दुल कादिर आणि मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन यांना अटक केली. त्यानंतर या तिघांनाही शांती नगर पोलीस ठाण्यात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले आणि त्यानंतर लखनऊला पाठवण्यात आले.