हिंदू कौन है? डोंबिवलीतल्या तिघांची ठरली शेवटची ट्रिप; दहशतवाद्यांनी एकामागून एक संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:12 IST2025-04-23T14:05:23+5:302025-04-23T14:12:08+5:30

डोंबिवली येथील तीन पर्यटकही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत.

Three people from Dombivli died in Pahalgam terror attack | हिंदू कौन है? डोंबिवलीतल्या तिघांची ठरली शेवटची ट्रिप; दहशतवाद्यांनी एकामागून एक संपवलं

हिंदू कौन है? डोंबिवलीतल्या तिघांची ठरली शेवटची ट्रिप; दहशतवाद्यांनी एकामागून एक संपवलं

Pahalgam Terrorist Attack:जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन नरसंहार केला.पहलगाममधल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची ओळख पटवून त्यांना संपवले. ठरवून हा हल्ला करण्यात आल्याचे पर्यटकांनी म्हटलं. महाराष्ट्रातील डोंबिवली येथील तीन पर्यटकही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत. दहशतवाद्यांनी हिंदू कोण आहेत असं विचारून गोळ्या झाडल्याचे मृत कुटुंबियांनी सांगितले.

पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना गोळ्या घालून ठार मारले. या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चुलत भावांचाही समावेश आहे. डोंबिवलीतील या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली भागातील रहिवासी असलेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी अशी तिघांची नावे आहेत. हे सर्वजण कुटुंबासमवेत शनिवारी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे चुलत भाऊ होते. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी संकुलात असलेल्या श्रीराम अचल इमारतीत अतुल मोने राहत होते. अतुल श्रीकांत मोने हे त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसह काश्मीरमधील  पहलगाममध्ये  पर्यटणासाठी गेले होते. अतुल मोने हे त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघे तिथे गेले होते. अतुल मोने रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होते.  

या हल्ल्यानंतर अतुल मोने यांची मेहुणी राजश्री अकुल यांनी या घटनेबाबत माहिती दिली. दहशतवाद्यांनी हिंदू कोण आहेत असे विचारल्यानंतर लोकांवर गोळ्या झाडल्या. त्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले, असे राजश्री अकुल म्हणाल्या. त्यांच्याशी माझं बोलणं होत नव्हतं. 

"संध्याकाळी जेव्हा आमचे बोलणे झाले तेव्हा त्यांनी आम्ही सगळे ठीक आहेत असं सांगितले. त्यामुळे थोडे टेंशन कमी झाले. मात्र आठ वाजता जेव्हा नावासह आणि फोटोसह माहिती येऊ लागली तेव्हा धक्का बसला. अतुल यांच्यासह तिन्ही पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या. महिला आणि मुलांना सोडून दिले. बहिणीने सांगितले की त्यांनी सर्वात आधी गोळीबार सुरु केला. त्यांनी आधी हेमंत जोशी यांच्यावर गोळी झाडली. त्यांनी इथं हिंदू कोन आहे असं विचारलं. त्यानंतर संजय लेले यांच्या डोक्यात गोळी मारली तर अतुल मोने यांना पोटात गोळी मारली. त्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले," असे राजश्री अकुल यांनी सांगितले. 

"मी सरकारला फक्त एकच आवाहन करते की सर्वांसमोर दहशतवाद्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून कोणीही कधीही कोणत्याही निष्पाप व्यक्तीचे जीवन संपवण्याचे धाडस करणार नाही," असेही राजश्री यांनी म्हटलं.
 

Web Title: Three people from Dombivli died in Pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.