महिलेवर वार करुन मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By मुरलीधर भवार | Updated: October 18, 2023 15:40 IST2023-10-18T15:39:53+5:302023-10-18T15:40:29+5:30
कल्याण खडकपाडा पोलीसांची कारवाई

महिलेवर वार करुन मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
कल्याण- मोहने परिसरातील महिलेचे मंगळसूत्र हिसकवण्यासाठी धारदार शस्त्राने हल्ला करत तिचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. अश्विन सदाफुले असे या हल्लेखोर चोरट्याचे नाव आहे. तो मोहने परिसतात राहतो .काही महिन्यांपूर्वी तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र काम सुटल्याने तो बेकार झाला होता .आर्थिक चणचणीमुळे त्याने चोरीचा मार्ग पत्करला आहे.
कल्याणच्या मोहने परिसरात प्रिया सावंत ही महिला आपल्या कुटुंबासह राहते .काल दुपारच्या सुमारास प्रिया आपल्या मुलीला शाळेतुन घेण्यासाठी मोहने कॉलनी परिसरातून जात होती. याच दरम्यान एक दुचाकीस्वार तिच्या समोर आला त्याने प्रिया हिचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रियाने प्रतिकार करताच या तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तो पसार झाला. या हल्ल्यात प्रिया जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीसानी पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू केला .अवघ्या काही तासातच आरोपी अश्विन सदाफुलें याला अटक करण्यात आला.