समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या, त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते- माधव भांडारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:09 IST2025-01-06T13:08:07+5:302025-01-06T13:09:42+5:30
"आम्ही जिथे जाऊ तिथे स्थान निर्माण करू"; कल्याणमध्ये माधव भांडारी यांचे प्रतिपादन

समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या, त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते- माधव भांडारी
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीतही मोठे योगदान आहे. समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे स्थान निर्माण करू, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी केले.
आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा ब्राह्मण सभा कल्याण, यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. किरण सामंत, आ. संजय केळकर, आ. संजय उपाध्याय, आ. कुमार आयलानी आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ. आशिष दामले उपस्थित होते. भांडारी म्हणाले, गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गाकडून सुरू आहे. ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही.
सध्या जातीपातीचे राजकारण
आपल्याबरोबर इतरांचा विचार करण्याची आपल्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला यापुढेही जोपासायची आहे, असे मत श्रीरामदास स्वामी यांचे अकरावे वंशज परमपूज्य भूषण महारुद्रस्वामी महाराज यांनी मांडले. महाराष्ट्र सुसंपन्न राहिला, कारण संत विचारांचा वरदहस्त होता, तो तारून नेणारा होता. परंतु आता जातीपातीचे राजकारण जास्त झाले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी आ. संजय केळकर आणि आ. संजय उपाध्याय यांचीही भाषणे झाली.
गोऱ्हेंनी मोबाइलवरून साधला संवाद
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हेदेखील आमंत्रित होते. परंतु तिघेही अनुपस्थित राहिले. दरम्यान, गोऱ्हे यांनी मोबाइलवरून समाजबांधवांशी संवाद साधला.