हरवलेली चार वर्षाची अन्यन्या सापडल्यानंतरच पोलिसांचा जीव भांडयात पडला
By मुरलीधर भवार | Updated: November 7, 2023 17:02 IST2023-11-07T16:54:10+5:302023-11-07T17:02:17+5:30
१८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षाची मुलगी एका महिलेजवळ सपडली. मुलगी सापडल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

हरवलेली चार वर्षाची अन्यन्या सापडल्यानंतरच पोलिसांचा जीव भांडयात पडला
कल्याण -कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाने फुले विकणाऱ्या महिलेची चार वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली. ज्या परिसरात बाजार समिती आवार आहे. त्या परिसरात नशेखोरांचा वावर असतो. त्यामुळे घाबरलेल्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली . बाजारपेठ पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. डॉग स्कॉडही आणला गेला. १८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षाची मुलगी एका महिलेजवळ सपडली. मुलगी सापडल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
कल्याण पश्चिमेतील जोशी बागेत राहणारी सुनिता माळी ही २८ वर्षीय महिला फुले पाने विकते. ती कल्याण पश्चीमेतील बाजार समितीच्या आवारात आली. तिची लहान मुलगी अन्यन्या ही तिच्या सोबतच होती. बाजार समितीमध्ये एक शेतकरी कट्टा आहे. तिथूनच चार वर्षाची अन्यन्या अचानक गायब झाली. कोणी तरी संशयित व्यक्तीने तिला घेऊन गेल्याचा संशय तिच्या आईला होता. या प्रकरणात कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तीन पथके तयार केली. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी लक्ष्मण साबळे, किरण वाघ, दीपाली वाघ, संतोष भुंडेरे, अजिंक्य मोरे यांचा पथकाने मुलीचा तपास सुरु केला. यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. जवळपास १८ तास पोलिसांची तीन पथके या मुलीचा शोध घेत होती.
अखेर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस पंकज परदेशी यांना माहिती मिळाली की, ही मुलगी एका महिलेकडे सुखरुप आहे. रात्री तीनच्या सुमारास पोलिस पथक त्या महिलेच्या घरी गेले. मुलगी इतत्र भटकत असताना त्या महिलेने तिला सुरक्षितेतेसाठी तिला घरी ठेवले असल्याचे सांगितले. चार वर्षाच्या अन्यन्या माळी हिला पोलिसानी तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. तेव्हा तिच्या आईच्या चेहऱ््यावर हास्य उमटले. मुलीला सुखरुप पाहून तिच्या आईने पोलिसांचे विशेष आभार मानले.