राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

By प्रशांत माने | Updated: March 26, 2023 16:53 IST2023-03-26T16:52:54+5:302023-03-26T16:53:23+5:30

विरोधकांबद्दल ईडी किंवा दुस-या कारवाईची भीती दाखवणे हा भाजपाचा खेळ आहे. तो देशाच्या लक्षात आलाय.

The action against Rahul Gandhi is vindictive; Criticism of Vanchit Bahujan Aghadi leader Anjali Ambedkar | राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

कल्याण - राहुल गांधी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने झाली असून देशात द्वेषाचे राजकारण सुरू असल्याचे मत वंचित बहुजन आघाडी प्रशिक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रा. अंजली आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडले. वंचित बहुजन ठाणे जिल्हा महिला आघाडीची निर्धार सभा शनिवारी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणावर पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

हिंदू आक्रोश मोर्चावरून आंबेडकर यांनी भाजपाला लक्ष केले. तुमचा आक्रोश मोर्चा कशाबद्दल हा प्रश्न भाजपला विचारण्याची गरज आहे ८० तक्के समाज हिंदू आहे. हिंदूंवर काय अन्याय झाला की त्यांना आक्रोश मोर्चा काढावा लागतो. हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवल जातं तेव्हा रस्त्यावर उतरणारा युवक हा बहुजन तरुण असतो. मुळात ८० टक्के एका बाजूला आहेत तर २० टक्के लोकांची काय भीती आहे हे विचारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज भारतातली सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सगळे इंडस्ट्रियलिस्ट अदानी सारखे उद्योगपती त्यांच्यासोबत आहे. त्यांनी देशाला मोठया प्रमाणात फसवले, पैसा लुबाडला हे सगळं समोर येत असताना आक्रोश मोर्चा हा खरं म्हणजे भाजप आणि मोदींच्या विरोधात असायला हवा असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

गुजरातमधील न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर न्यायालयाने स्वत:च्याच निर्णयाला स्थगिती दिली आणि राहुल गांधींना उच्च न्यायालयात जाण्याची संधी दिली आहे. ज्या वेळेला स्थगिती दिली जाते त्यावेळेला उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्यावर कोणी कारवाई करायचे नसते त्यामुळे राहुल यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केलेली असून हे द्वेषाचे राजकारण असल्याचे त्या म्हणाल्या. आंबेडकर यांनी संजय राऊत हक्कभंगाच्या मुद्दावरही भाष्य केले. विरोधकांबद्दल ईडी किंवा दुस-या कारवाईची भीती दाखवणे हा भाजपाचा खेळ आहे. तो देशाच्या लक्षात आलाय. मात्र वंचित बहुजन आघाडी कोणत्याही प्रकारची वैचारिक तडजोड न करता भाजपावर टीका करते मात्र आमच्यावर ईडी येऊ शकत नाही कारण आमचे सगळयांचे स्वच्छ व्यवहार आहेत याकडेही आंबेडकरांनी लक्ष वेधले.

Web Title: The action against Rahul Gandhi is vindictive; Criticism of Vanchit Bahujan Aghadi leader Anjali Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.