ठाकुर्लीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय
By प्रशांत माने | Updated: November 17, 2023 18:33 IST2023-11-17T18:32:24+5:302023-11-17T18:33:33+5:30
मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाकुर्लीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकच्या बाजुकडील झाडीत ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह जळालेला अवस्थेत बुधवारी रात्री आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याची जाळून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईत जे. जे रूग्णालयातील पाठविण्यात आला असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण उघड होईल अशी माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.
ठाकुर्ली पुर्वेकडील पारिजात बिल्डींग, अशोक सिंघल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरात रात्रीच्या सुमारास रेल्वे पोलिसांची गस्त सुरू असताना रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी झुडपा जवळ जाऊन पाहिले असता एक व्यक्ती अर्धवट जळत असलेल्या स्थितीत आढळून आली. त्यावर लगेचच पाणी टाकून आग विझवली गेली. आणि याची माहिती तत्काळ टिळकनगर पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट स्थितीत जळालेल्या व्यक्तीला उपचारार्थ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीला मृत घोषित केले. दरम्यान मृतदेह ताब्यात घेत टिळकनगर पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मुंबईतील जे जे रूग्णालयात पाठविला आहे. तपासणीनंतर मृत्यूचे कारण समोर येईल आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरीष्ठ निरिक्षक नितीन गिते यांनी दिली.