धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
By मुरलीधर भवार | Updated: November 28, 2022 14:59 IST2022-11-28T14:56:29+5:302022-11-28T14:59:03+5:30
ठाणो येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते.

धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
कल्याण - धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याने एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान घडली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरु केला. धावत्या रेल्वे गाड्यांवर होणारी दगडफेक पोलिसांनी रोखली पाहिजे. दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली पाहिजे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.
ठाणो येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. आज सकाळी नांदेडहून राज्यराणी एक्सप्रेसने कल्याणला येत असताना आंबिवली आणि शहाड स्थानका दरम्यान कोणी तरी गाडीवर दगड फेकला. या दगडफेकीत महिला प्रवासी रखमाबाई पाटील (५५) डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. रखमाबाई यांच्या डोळ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आधी या घटनेची माहिती पोलिसाना नव्हती. प्रसार माध्यमातून बातम्या पसरल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिस खळबळून जागे झाले.
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ज्या ठिकाणी या महिलेवर दगडफेक झाली आाहे. त्याच ठिकाणाहून अनेक वेळा दगडफेकीचे प्रकार घडलेले आहे. या ठिकाणाहून दगडफेक करणारे रेल्वे गाड्यावर दगड भिरकावतात. प्रवाशांच्या हातातील वस्तू खाली पडताच ती वस्तू घेऊन पसार होतात. अशा प्रकारची घटना आज पुन्हा घडल्याने रेल्वे प्रवाशी सुरक्षितता पुन्हा धोक्यात आली आहे. दगडफेक करणारा अटक होणार की नाही की मोकाटच राहणार असा संतप्त सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.