दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करा; राजू पाटलांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:03 IST2021-08-12T17:02:44+5:302021-08-12T17:03:25+5:30
रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा...

दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करा; राजू पाटलांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट
कल्याण: मनसे आमदार राजू पाटील यांनी आज रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आज दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे.यावेळी त्यांनी पत्र देत रेल्वे प्रवाश्यांसाठी काही मागण्या केल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे.
दिवा ते पनवेल लोकलसेवा सुरु व्हावी अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. दिवा ते पनवेल दरम्यान दातिवली, निळजे, तळोजा पंचानंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल अशी स्टेशन येत असून हा भाग मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येत असल्याने नागरी वस्ती वाढत आहे. सध्या दिवा ते रोहा दरम्यान रेल्वे शटल सेवा सुरु असून दर दिवशी ठराविक वेळेतच या गाड्या सुटतात. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. दातिवली, निळजे, तळोजा पंचानंदसह अगदी कळंबोली पर्यंत मोठमोठे गृहप्रकल्प झालेले आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे सुरु असून दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे.
निळजे, तळोजा येथील नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या स्टेशनवर गेल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सदर स्टेशन गाठण्यासाठी प्रवाशांना जवळ जवळ सात ते आठ किमी प्रवास करावा लागतो त्यामुळे वेळ, पैसा वाया जातोच व प्रवाशांची प्रचंड गैरसोयही होते. त्यातच परिवहन सेवाही अपुरी असून या परिसरातून मुंबई-ठाणे परिसरात नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात.
सध्या नवी मुंबई विमानतळाचेही काम सुरु झालेले आहे. त्याचाही बराचसा भाग या परिसराला जोडलेला आहे.तसेच या परिसरातून केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मल्टीमॉडेल कॉरिडॉर जाणार असून त्याचेही काम सुरु आहे. अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्य वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टीकोनातून लोकलसेवा सुरु करणेच हाच उत्तम पर्याय आहे.असे मनसे आमदार यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे दिल्लीत जाऊन केली आहे.