कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंसोबत असल्याची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:55 IST2022-06-21T14:31:13+5:302022-06-21T14:55:11+5:30
Shiv Sena MLA Vishwanath Bhoir : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांच्या खास मर्जीतील कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील नॉट रिचेबल झाले आहेत.

कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंसोबत असल्याची जोरदार चर्चा
कल्याण - विधान परिषद निवडणूक निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांच्या खास मर्जीतील कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील नॉट रिचेबल झाले आहेत. आमदार भोईर यांचा मोबाईल स्विच ऑफ असून कुटुंबियांशी संपर्क साधला असता आमदार कुठे आहेत हे आपल्याला माहीत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर आमदार भोईर हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेतच असल्याचे कळते.
कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक सकाळपासून राजकीय घडामोडीकडे लक्ष लावून बसले आहेत. तर दुसरीकडे कल्याण पोलिसांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला आहे. शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, परंतू ठाण्यातील त्यांचे खास पदाधिकारीदेखील सुरतला गेले आहेत. परंतू, शिंदेंचे खासदार पूत्र कुठे आहेत? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
श्रीकांत शिंदे हे कालच अचानक परदेशात निघून गेल्याचे काही जण चर्चा करत आहेत. परंतू, ना परदेशात, ना सुरतमध्ये आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे हे ठाण्यातच आहेत. सकाळीच त्यांच्याशी लोकमतने संपर्क साधला होता. मात्र, ते आपल्या निवासस्थानी नाहीत, तर अज्ञात ठिकाणी गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर दररोज जी वर्दळ असते ती खूपच कमी झालेली आहे. त्यांचे रोजचे कार्यकर्ते देखील शिंदेंच्या घरी फिरकलेले नाहीत. जे आले ते नजरानजर लपवत आहेत. शिंदे यांनी आपले काही खंदे शिलेदार आपल्यासोबत सुरतला नेले आहेत. या शिलेदारांचे फोनही नॉट रिचेबल येत आहेत. आनंद मठामध्येही वर्दळ कमालीची रोडावली आहे. ठाण्यातील काही आमदार ठाण्यातच असले तरी प्रताप सरनाईक मात्र शिंदेंसोबत असल्याचे समजते आहे.