शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:44 IST2025-11-07T06:43:24+5:302025-11-07T06:44:04+5:30
आगामी निवडणुकीत भाजपला आडवे करून दाखवू : शिंदेसेना; करुन बघा, भाजपची ताकद किती आहे ते कळेल: भाजप

शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती झाली नाही तर निवडणुकीत भाजपला आडवे करू, अशा शब्दांत शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मित्रपक्षाला आव्हान दिले, तर युती होती तेव्हा शिंदेसेनेने बंडखोरी केली. युतीचा धर्म पाळला नाही. शिंदेसेनेला युती नको असेल तर त्यांनी उघडपणे सांगावे. मग आम्ही समोरासमोर लढू. निवडणुकीत भाजपच सरस ठरणार. युती तोडा म्हणजे भाजपची ताकद किती आहे ते कळेल, अशा शब्दांत भाजपचे नेते नरेंद्र पवार यांनी मोरे यांना प्रतिआव्हान दिले.
शिंदेसेनेचा नारी शक्ती मेळावा बुधवारी पार पडला. या मेळाव्यात शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख मोरे यांनी युतीबाबत भाष्य केले. नरेंद्र पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. शिवसेनेचे दहा बंडखोर उभे होते. त्यामुळे मागे पवार यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली हे त्यांनी विसरू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांना भेटायचे, त्यांच्याशी गोडगोड बोलायचे आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शाब्दिक वार करायचे हा दुटप्पी खेळ पवार खेळत असून, शिंदेसेना असे खेळ खेळत नाही, असे मोरे म्हणाले.
कार्यकर्त्यांची भावनाही स्वबळावर लढण्याची
कल्याण डोंबिवलीत स्थानिक पातळीवर शिंदेसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर निवडणुका लढविण्याची आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर काय कारवाई करतील, याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक महायुती करून लढवली जाणार, असे सूतोवाच केले होते. त्यांचा उद्देश स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना ब्रेक लावणे हा होता. मात्र, मोरे आणि पवार यांनी युतीविरोधी सूर लावला.