ठाणे-कल्याणदरम्यानचा ताण कमी करण्यासाठी सातवा-आठवा मार्ग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:18 IST2025-12-17T13:15:07+5:302025-12-17T13:18:34+5:30
मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार झपाट्याने होत असल्याने लोकलने ठाणे-कल्याण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या १२ ते १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

ठाणे-कल्याणदरम्यानचा ताण कमी करण्यासाठी सातवा-आठवा मार्ग?
मुंबई : ठाणे-कल्याण मार्गावरील वाढता ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने परळ-ठाणे-कल्याण कॉरिडॉरवर ७ वा आणि ८ वा रेल्वेमार्ग उभारण्याच्या दृष्टीने अंतिम लोकेशन सर्वेक्षण (एफएलएस) सुरू करण्यासाठी संस्थेची नियुक्ती केली आहे. या सविस्तर तांत्रिक अभ्यासातून जमिनीची उपलब्धता, पूल, स्थानके, तसेच इतर आवश्यक संरचनांची गरज, याचा आढावा घेतला जाणार आहे त्याचबरोबर डोंबिवली-कल्याणदरम्यान भूमिगत मार्ग उभारण्याची शक्यताही तपासली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार झपाट्याने होत असल्याने लोकलने ठाणे-कल्याण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या १२ ते १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. सकाळ व सायंकाळी गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर होते.
कल्याण ते डोंबिवली भूमिगतचा पर्याय
मध्य रेल्वेने २०२२ मध्ये ठाणे-दिवा विभागातील पाचवा आणि सहावा मार्ग पूर्ण केला होता. आता ठाणे ते कल्याणदरम्यान अतिरिक्त मार्ग उभारण्याची आवश्यकता भासत आहे. काही भागांत जमीन उपलब्ध असल्याने नवीन मार्गिका उभारणे शक्य असले, तरी डोंबिवलीच्या आसपास जागेच्या मर्यादेमुळे भूमिगत मार्गाचा पर्याय विचाराधीन आहे.
दररोज एक हजार लोकलची ये-जा
१. सध्या याच कॉरिडॉरवर धिम्या जलद लोकल, मेल-एक्स्प्रेस, तसेच मालगाड्यांची वाहतूक सर्वाधिक होत असल्याने उपलब्ध ट्रॅक अपुरे पडत आहेत. या मार्गावर दररोज सुमारे एक हजार लोकल धावत असून, पाचवा व सहावा मार्ग अस्तित्वात असला तरी तो पुरेसा नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२. ठाणे-कल्याण कॉरिडॉरवरील ठाणे, दिवा आणि कल्याण ही प्रमुख जंक्शन स्थानके आहेत. ठाण्याहून ट्रान्स-हार्बर मार्गे पनवेलकडे, दिव्याहून रोह्याकडे तर कल्याणहून मुख्य मार्ग कसारा आणि कर्जत-खोपोली अशा दोन दिशांना गाड्या जातात. या सर्व भार्गाचा ताण एकाच कॉरिडॉरवर येत असल्याने नव्या मागिकांची गरज निर्माण झाली आहे.