दोन कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण! मुलाची सुखरूप सुटका; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:07 IST2025-03-28T20:07:24+5:302025-03-28T20:07:40+5:30

शाळेत सोडणा-या रिक्षाचालकानेच रचला कट

School boy kidnapped for ransom of Rs 2 crore! Boy safely rescued; Four arrested | दोन कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण! मुलाची सुखरूप सुटका; चौघांना अटक

दोन कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण! मुलाची सुखरूप सुटका; चौघांना अटक

डोंबिवली: दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासात शहापूर परिसरातून सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. महत्वाचे म्हणजे शाळेत सोडणा-या रिक्षाचालकानेच हा अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. विरेन पाटील असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

पुर्वेकडील रिजेन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारे बांधकाम व्यावसायिक महेश भोईर यांचा इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकणारा मुलगा कैवल्य (वय ७) हा शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेसाठी नेण्यासाठी येणा-या नेहमीच्या रिक्षातून निघाला. दरम्यान सकाळी ९ च्या सुमारास रिक्षाचालक विरेन पाटील याच्या मोबाईलवरून महेश यांना व्हॉटसअप कॉल आला. एका अनोळखी व्यक्तीने त्यावर संवाद साधत तुमच्या मुलाचे रिक्षाचालकासह अपहरण केले आहे दोन कोटी रूपये दयावे लागतील पोलिसांना कळविल्यास दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान महेश यांची पत्नी कोमल हिने लागलीच मानपाडा पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिली. चिमुकल्याच्या अपहरणाच्या प्रकाराबाबत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली मुलाच्या शोधासाठी पाच पथके नेमली होती.

अपहरणाचा बनाव झाला उघड

महत्वाचे म्हणजे मुलाला शाळेत ने-आण विरेन आणि त्याचा भाऊ करायचा. सलग येणारा विरेनचा भाऊ शुक्रवारी आला नाही. विरेन शाळेत नेण्यासाठी आला. विरेनच्या मोबाईलवरून व्हॉटसअप कॉल करून खंडणी मागितली जात असल्याने पोलिसांचा विरेनवर संशय बळावला. विरेनच्या भावाला देखील चौकशीकामी पोलिस ठाण्यात आणले होते. दरम्यान संबंधित मोबाईल ट्रेस करत पोलिसांची पथके शहापुर परिसरात पोहोचली आणि रिक्षाच्या नंबरवरून तीचा शोध घेत कैवल्यची अवघ्या साडेतीन तासात सुखरूप सुटका केली. महत्वाचे म्हणजे चौकशीत रिक्षाचालक विरेन यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले.

आणखीन आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता

चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये आणखीन काही आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांचे मानले धन्यवाद

कैवल्य याची सुखरूप सुटका केल्याबद्दल त्याचे वडील महेश यांनी मानपाडा पोलिस प्रशासनाचे धन्यवाद मानले आहेत.

Web Title: School boy kidnapped for ransom of Rs 2 crore! Boy safely rescued; Four arrested