कल्याण पोलिस ठाण्यावर ९० आरोपींचा ताण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:29 IST2025-03-12T09:29:01+5:302025-03-12T09:29:01+5:30
एलटीटीमध्ये नव्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात हवी कोठडी

कल्याण पोलिस ठाण्यावर ९० आरोपींचा ताण
अनिकेत घमंडी
डोंबिवली : मध्य रेल्वेवर लोकमान्य टिळक टर्मिनस, अंबरनाथ, आसनगाव आणि पश्चिम रेल्वेवर मीरा-भाईंदर या लोहमार्ग पोलिस ठाण्यांना गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नवे पोलिस ठाणे हे त्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात सुसज्ज जागेत, अद्ययावत असावीत. त्यात मुख्यतः कोठडीची (लॉकअप) सुविधा असणे गरजेचे आहे. आरोपींची सुरक्षित ने-आण करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. दरम्यान, कल्याण पोलिस ठाण्यात महिन्याकाठी ९० आरोपींचा ताण येतो.
ठाणे, डोंबिवली, कर्जतमध्ये लोहमार्ग पोलिस ठाणी आहेत; परंतु लॉकअपची सुविधा नाही. त्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी असा ताफाही आहे. ठाण्यात लांबपल्ल्याच्या गाड्या, लोकल, ट्रान्स हार्बरची सेवा आहे. त्यामुळे या स्थानकात गुन्ह्यांचे प्रमाणही तुलनेने अधिक असूनही गुन्ह्यातील आरोपींसाठी येथे लॉकअपची सुविधा नाही. एलटीटीचे सर्व गुन्हे कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदविले लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदविले पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आरोपींना कल्याण पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणले जाते. तेथेच कल्याण शहर भागातील काही पोलिस ठाण्यांतील आरोपींनाही आणले जाते. कल्याण हे अहोरात्र गजबजलेले स्थानक असून, त्या ठिकाणी चार विविध ठिकाणांच्या आरोपींना आणले जात असल्याने अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त आरोपी होण्याची स्थिती असते.
लोकलमधून आणले जाते आरोपीला
कल्याणच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याहून सरासरी एक, कल्याणमध्ये दोन, कर्जत आणि शहर हद्दीतून येणारे आरोपी असे रोज तीन आरोपी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये येतात. सगळे मिळून सरासरी महिन्याला ७० ते ९० आरोपी लॉकअपमध्ये आणले जातात. ठाण्यातून लोकलने, काही वेळेस वाहनाने आरोपीला आणले जाते. एलटीटीचे सर्व गुन्हे कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदविले जातात. कल्याण भागातील ठाण्यांतील आरोपींनाही आणले जाते.
नव्याने होणाऱ्या लोहमार्ग पोलिस ठाण्यांची हद्द निश्चितीचे काम वेगाने सुरू आहे. आठवडाभरात ते झाले की, त्या ठाण्यांच्या जागेसाठीचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. सर्वच नवीन पोलिस ठाणी हे निश्चितच अद्ययावत सोयी-सुविधायुक्त असतील. त्यात कोठडीची व्यवस्था देण्याचा प्रयत्न असेल- रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस