डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 07:00 IST2025-12-14T06:59:18+5:302025-12-14T07:00:19+5:30
डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील एक रस्ता शनिवारी गुलाबी झाल्याने रासायनिक कंपन्यांकडून होत असलेल्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील एक रस्ता शनिवारी गुलाबी झाल्याने रासायनिक कंपन्यांकडून होत असलेल्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली एमआयडीसीत ४२० कंपन्या आहेत. त्यापैकी बहुतांश कंपन्या या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या आहेत. उर्वरित रासायनिक कंपन्या आहेत.
डोंबिवलीत २०१४ साली हिरवा पाऊस पडला होता. प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडल्याने डोंबिवली चर्चेत आली होती. २०२० मध्ये डोंबिवलीतील एमआयडीसीतील एका कंपनीसमोरचा रस्ता गुलाबी झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती.
१०७ कंपन्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर ३८ कंपन्यांविरोधात दाखल केले होते गुन्हे
१. रासायनिक कंपन्यांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार नसतील, सुरक्षिततेचे आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसतील तर त्या कंपन्यांना टाळे ठोकण्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा विभाग, अग्निशमन दलाने संयुक्तरीत्या १०७ कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ३८ कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.
२. या सर्वेक्षणानंतर काही कंपन्या स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या सरकारने कंपन्या स्थलांतरित करण्याचा पुनर्विचार करण्याचे भाष्य केले होते. त्यानंतर पुढे काही एक कार्यवाही झालेली नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला नाही.
आंदोलनाचा इशारा
भाजपचे दीपेश म्हात्रे म्हणाले की, प्रदूषणाच्या या घटना डोंबिवलीत वारंवार घडतात. त्याला एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना केली नाही तर भाजपच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल.