ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:01 IST2025-11-07T06:00:20+5:302025-11-07T06:01:23+5:30
गोंधळाचा फायदा घेऊन ओला, उबर सेवांनीही भाडे नाकारून व दामदुप्पट दर आकारून प्रवाशांना वेठीस धरले

ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मुंबईमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका ठाणे, दिवा, कल्याणरेल्वेस्थानकातील लाखो लोकल प्रवाशांना गुरुवारी सायंकाळी बसला. ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी ६:३० नंतर लोकल वाहतूक ठप्प झाल्याने जवळपास सर्वच फलाटांवर व मुख्यत्वे कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या व जलद मार्गावरील फलाट प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते.
ठाण्याहून मुंबईकडे जाणारी लोकल ऐनवेळी कर्जतच्या दिशेने सोडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी फलाट क्र. तीनवर संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ वातावरण तणावाचे बनले होते; पण त्या विरोधानंतरही लोकल कर्जतच्या दिशेने सोडण्यात आली. त्यामुळे ठाण्यात तासभर अडकून पडलेल्या शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला. संध्याकाळी ७ नंतर रात्री उशिरापर्यंत ठाणे स्थानकात फलाट एक ते सहा आणि फलाट ९ व १० वर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोकल गोंधळाचा फायदा घेऊन ओला, उबर सेवांनीही भाडे नाकारून व दामदुप्पट दर आकारून प्रवाशांना वेठीस धरले.
रिक्षाचालकांनीही मनमानी भाडे आकारण्यास सुरुवात केली. ठाण्यातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने विशेष लोकल गाड्या ठाणे ते कर्जत, कसारा मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला. कालांतराने मुंबईतून लोकल सेवा सुरू झाली. मात्र, ठाण्यात मुंबईकडून येणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास विलंबाने येत असल्याने त्या सर्व गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांना उतरताना प्रचंड हाल झाले. गाडीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये वादविवाद, हाणामारी असे प्रसंग वरचेवर घडत होते. दिवा आणि कल्याणमध्ये अशीच भीषण परिस्थिती पाहायला मिळाली.
काही प्रवासी फलाटावरच कोसळले
- लोहमार्ग पोलिस, रेल्वे पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रवाशांचा लोंढा संध्याकाळी ७ ते ८:३० या वेळेत प्रचंड असल्याने जो तो येणाऱ्या लोकलमध्ये कसे चढता येईल यासाठी जिवाची पर्वा न करता गर्दीत स्वतःला झोकून देत होता.
- त्यात अनेकांच्या पर्स, बॅगांचे नुकसान झाले. काही प्रवासी गर्दीमुळे फलाटावरच कोसळले. दरम्यान, महिला प्रवाशांचे गर्दीमुळे प्रचंड हाल झाले.