विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 06:06 IST2025-12-19T06:06:16+5:302025-12-19T06:06:30+5:30
महापालिका निवडणुकीत प्रभागा-प्रभागांमधील लाडक्या बहिणींची मनमर्जी संपादन करण्याकरिता संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या सोहळ्यांचे आयोजन सुरू झाले आहे.

विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महापालिका निवडणुकीत प्रभागा-प्रभागांमधील लाडक्या बहिणींची मनमर्जी संपादन करण्याकरिता संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या सोहळ्यांचे आयोजन सुरू झाले आहे. या निमित्ताने लकी ड्रॉ काढून पैठणींपासून नींपर्यंत आणि टीव्ही-फ्रिजपासून वॉशिंग मशीन-एसीपर्यंत अनेक महागड्या गृहोपयोगी वस्तूंचे वाण वाटण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. संक्रांतीच्या निमित्ताने केलेली ही क्लृप्ती कोणकोणत्या उमेदवारांच्या पदरात विजयाचे 'वाण' टाकते, याकडे लक्ष लागले आहे.
मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आता पुढे जानेवारीत मकरसंक्रांतीपर्यंत महिलांना अपेक्षित असलेले वाण लुटण्यासाठी उमेदवारांनी सुरुवात केली. १३ जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या मंडळ, संस्थांच्या नावे डोंबिवली-कल्याणमध्ये हळदी-कुंकू समारंभांचे पेव फुटले. हळदी-कुंकू सोहळ्यासोबत सुग्रास भोजनाचा योग आहे. महिलांना वाण म्हणून चांगल्या साड्या, पैठणी, मौल्यवान नथी अशा वस्तू दिल्या जाणार आहेत.
वेगवेगळ्या परिसरांतील महिलांच्या आर्थिक दर्जानुसार हे वाण दिले जाते. एवढ्यावरच भागत नाही. ज्या महिला परिसरातील महिलांवर प्रभाव पाडू शकतील, त्यांना खुबीने लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी दिले जाणार आहेत. बहिर्णीचे उमेदवारांकडून होणारे हे लाड पाहून पुरुषांचा पोटशूळ उठू नये याकरिता त्यांना ऑफिस बॅग, मुलांना स्कूल बॅगचेही वाटप केले जात आहे. झोपडपट्टया, चाळीच्या भागात चांगल्या चपला, बूटदेखील देण्याची तयारी उमेदवारांनी केली आहे.
ज्येष्ठांना काठ्या, गरम पाण्याच्या पिशव्या
ज्येष्ठ नागरिकांसाठी कमरेचे बेल्ट, काठ्या, गरम पाण्याच्या पिशव्या, मसाज गन देण्याचे नियोजन केले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सायकल, चष्मे, विशेष काठ्या देण्याचे नियोजन आहे.