एआयच्या युगात जुनी शिक्षणपद्धत परवडणार नाही: अनिल काकोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 08:55 IST2026-01-19T08:55:19+5:302026-01-19T08:55:19+5:30
'सृजन कुंभ' उदयोन्मुख तंत्रज्ञान परिषदेला प्रारंभ

एआयच्या युगात जुनी शिक्षणपद्धत परवडणार नाही: अनिल काकोडकर
कल्याण : शिक्षणाची व्याप्ती वाढली असून, ठराविक वयोमर्यादा, कालबद्ध अभ्यासक्रम आणि सतत वाढणारे नवे ज्ञान या सगळ्यांचा मेळ घालणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. 'एआय'च्या युगात विद्यार्थी केंद्रित शिक्षणपद्धती स्वीकारणे अपरिहार्य आहे, असे परखड मत राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद आणि इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, बापसई फार्मसी-आयटीआय, यांच्यावतीने झालेल्या 'सृजन कुंभ' या उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष व आंतरशाखीय संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, नामदेव मांडगे डॉ. विजय महाजन उपस्थित होते.
कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होण्याची भीती
पूर्वी शिक्षणाचा अंतिम उद्देश सरकारी नोकरी मानला जायचा. पुढे पुढे उद्योगधंदे आणि उद्योजकता वाढीस लागली; मात्र आज 'एआय' आणि 'ऑटोमेशन'मुळे परिस्थिती पुन्हा बदलत आहे. दहा जणांचे काम एकाच व्यक्तीकडून होत असून, खर्च वाढत असल्याने सरकारी नोकऱ्या कमी करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. उद्योगांमध्ये एआयच्या वापरामुळे कामगारांविना काम होण्याची शक्यता निर्माण होत असताना, दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होण्याची भीती आहे. मात्र, त्याच वेळी नव्या तंत्रज्ञानातून नवीन संधीही उपलब्ध होत असल्याचेही डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.
काकोडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना ज्या विषयांत रस आहे, त्या क्षेत्रातील शिक्षण घेण्याची मुभा देणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबतीत पूर्वी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आता जुन्या पद्धतीने चालत राहणे परवडणारे नाही. काही ठिकाणी सकारात्मक बदल सुरू झाले असून, त्यासाठीची तयारी म्हणजेच असे कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंगणवाडी सेविकांचे गंभीर प्रश्न निर्माण होणार
अंगणवाडी सेविकांचा भर आरोग्य, लसीकरण आणि पोषण यासारख्या सहा गोष्टींवर होता. आता त्यात शिक्षणाची भर पडली आहे. शिक्षण झालेल्या मात्र, आठवीपर्यंत सेविकांकडून बालशिक्षणाची अपेक्षा कशी करणार? यामुळे, भविष्यात अंगणवाडी सेविकांचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.