कल्याण : प्रांत: विधीच्या समस्येने त्रस्त असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीची हत्या तिच्या चुलत मावशीने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी चुलत मावशी अर्पणा कांबरी व तिचा पती प्रथमेश (रा. भिवपुरी) या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील राहुल घाडगे याला चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा होऊन तो कारागृहात गेला. त्यानंतर त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले. चार वर्षांची मुलगी एकटी असल्याने अर्पणाने तिला कर्जत येथे आपल्या घरी नेले.
काही दिवसांनंतर मुलीची आत्या ज्योती सातपुते हिने मुलीच्या सांभाळाची विनंती केली, मात्र कांबरी दाम्पत्याने टाळाटाळ केली. त्यानंतर मुलगी गायब असल्याचे लक्षात आल्यावर आत्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान कांबरी दाम्पत्याने चौकशीसंदर्भात दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी सखोल तपास करून सत्य उघड केले. प्रांत:विधीच्या समस्येमुळे त्रस्त होऊन अर्पणाने मुलीला मारहाण केली. या मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यानंतर, तिचा मृतदेह कर्जतच्या जंगलात फेकून देऊन विल्हेवाट लावण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.