एमएमआरडीए अर्थसंकल्पात मेट्रो - रस्ते प्रकल्पांना गती मिळणार; ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद
By मुरलीधर भवार | Updated: February 17, 2026 14:57 IST2026-02-17T14:57:27+5:302026-02-17T14:57:54+5:30
कल्याण लोकसभा मतदार संघातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तब्बल ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

एमएमआरडीए अर्थसंकल्पात मेट्रो - रस्ते प्रकल्पांना गती मिळणार; ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद
- मुरलीधर भवार
कल्याण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचा ( एमएमआरडीए ) २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये एमएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तब्बल ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये मेट्रो - ५, आणि मेट्रो - ५ अ विस्तारीकरण, मेट्रो १२, मेट्रो १४, कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल , कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३ ) या प्रकल्पांचा समावेश आहे. या भरीव निधीच्या तरतुदीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एमएमआरडीए प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले आहेत.
यासोबतच रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांनाही मोठी चालना मिळणार आहे. कल्याण-शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३ ) या प्रकल्पांचा समावेश असून, या मार्गांमुळे शहरांतर्गत आणि आंतरशहरी वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच औद्योगिक आणि लॉजिस्टिक वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारच्या सहकार्यामुळे कल्याण मतदारसंघातील महत्वाकांक्षी वाहतूक प्रश्न मार्गी लागत असून नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
या प्रकल्पांना भरीव निधीची तरतूद
मेट्रो - ५ ( ठाणे - भिवंडी - कल्याण ) - १ हजार ३०९.३० कोटी
मेट्रो - ५ अ ( विस्तारित ) ( दुर्गाडी ते उल्हासनगर ) - १८३.३५ कोटी
मेट्रो - १२ ( कल्याण ते तळोजा ) - १ हजार ५४.५४ कोटी
मेट्रो - १४ ( कांजूरमार्ग - बदलापूर ) - ५०० कोटी
कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल - १५० कोटी
कल्याण रिंग रोड - ६०० कोटी
विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग - २०० कोटी
ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३) - ९०० कोटी
लक्षणीय बदल
मेट्रो मार्गिकांचा विस्तार याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. एमएमआरडीएने तरतूद केलेल्या या निधीतून मेट्रो जाळ्याचा विस्तार हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मेट्रो-५ तसेच मेट्रो-५अ विस्तारीकरण, मेट्रो-१२ आणि मेट्रो-१४ या महत्त्वाकांक्षी मार्गांच्या कामांना गती दिली जाणार आहे. या मेट्रो प्रकल्पांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ थेट महानगरातील प्रमुख व्यावसायिक व निवासी पट्ट्यांशी जोडला जाणार असून, रोजच्या प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणालीला बळ मिळणार आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ केवळ निवासी विस्ताराचा भाग न राहता नियोजित शहरी विकासाचे केंद्र म्हणून विकसित होईल. वाढत्या महानगर विस्तारात कल्याण लोकसभा परिसराला स्वतंत्र ओळख देणारा हा अर्थसंकल्प ठरणार असून, येत्या काळात येथील वाहतूक, उद्योग, गुंतवणूक आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल घडेल.