डोंबिवलीत 'परप्रांतीय' भाजी विक्रेत्यांची दादागिरी; मराठी भाजी विक्रेत्याला जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 20:03 IST2021-09-03T20:01:42+5:302021-09-03T20:03:28+5:30
गोळवली येथे राहणारे कमलाकर पाटील हे डोंबिवली पूर्वेकडील राजेश ज्वेलर्स दुकान परीसरातील भाजी मार्केट गल्ली मध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.

डोंबिवलीत 'परप्रांतीय' भाजी विक्रेत्यांची दादागिरी; मराठी भाजी विक्रेत्याला जबर मारहाण
कल्याण - कल्याण डोंबिवली शहरात फेरीवाल्यांचा मुद्दा संवेदनशील झाला आहे. त्यातच ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर परप्रांतीय फेरीवल्याकडून प्राणघातक हल्ला झाल्यानं परप्रांतीयांच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळवली येथे राहणारे कमलाकर पाटील हे डोंबिवली पूर्वेकडील राजेश ज्वेलर्स दुकान परीसरातील भाजी मार्केट गल्ली मध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. यावेळी सांगरली येथे राहणारे परशुराम मल्याली ,जयेश मल्याली, सुभाष मल्याली आणि विष्णू मल्याली हे देखील पाटील दाम्पत्यांच्या बाजूला भाजी विकायला बसले होते . यावेळी कमलाकर पाटील यांच्या पत्नीने या चौघांना ओरडून भाजी विकू नका असं सांगितले. या गोष्टीचा राग मनात ठेवून या चौघांनी शिवीगाळ करत पाटील यांना लाकडी बांबूने व ठोशाबुक्याने जबरदस्त मारहाण केली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी वाढली असल्याचे अधोरेखित झाले आहे. या घटनांमुळे स्थानिक मराठी भाजी व किरकोळ विक्रेत्यांमध्ये देखील भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे समजते. याप्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.