‘त्या’ मराठी कुटुंबावरही मारहाणीचा गुन्हा; मानपाडा येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:44 IST2024-12-24T08:44:34+5:302024-12-24T08:44:43+5:30
तक्रारीवरून मराठी कुटुंबातील तीन व्यक्तींसह एका अनोळखी महिलेवर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला

‘त्या’ मराठी कुटुंबावरही मारहाणीचा गुन्हा; मानपाडा येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल
कल्याण : आपल्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रिना यांच्यावर पोक्सो आणि मारहाणीचा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला असताना, पांडे याच्या तक्रारीवरून मराठी कुटुंबातील तीन व्यक्तींसह एका अनोळखी महिलेवर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पिडीत अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसह खेळत असताना, आरोपी पांडे याने तिला जबरदस्तीने घरात ओढून घेतले आणि तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप पिडीतेच्या आईने केला आहे. पांडेला जाब विचारण्यासाठी गेले असता, कुटुंबाला त्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर, मुलीला इमारतीच्या पॅसेजमध्ये खेळत असताना दंगा करू नको, असे सांगितले, म्हणून संबंधित कुटुंबाने आम्हा पती-पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप पांडेने केला आहे. मारहाणीत त्याच्या डोळ्यांवर दुखापत झाल्याचेही त्याने तक्रारीत नमूद केले आहे. पांडे सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे.
...अन्यथा मनसे कायदा हातात घेईल
मनसेचे माजी आ. प्रकाश भोईर यांनी सोमवारी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांची भेट घेऊन चर्चा केली.
भोईर यांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठी कुटुंबावर दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त केली. आरोपी पांडेवर लवकर कारवाई करावी, अन्यथा मनसे कायदा हातात घेईल, असा इशारा त्यांनी दिला.
तातडीने कारवाई करावी
चौकशी कसली करता कारवाई हवी. सत्ताधारी पक्षाने याकडे लक्ष द्यावे. जे आरोपी यामध्ये आहेत, त्यांना अटक करावी. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा आमचा पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा उद्धवसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आ. राजेश मोरे यांनी केली आहे.