कल्याणला ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला अन् सेंट्रल रेल्वेवर २ तास वाहतूक खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:28 IST2026-03-23T05:27:34+5:302026-03-23T05:28:18+5:30

विजेच्या जोरदार धक्क्याने कोसळल्याने जखमी 

man climbs over overhead wire pole in Kalyan disrupts traffic on central Railway for 2 hours | कल्याणला ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला अन् सेंट्रल रेल्वेवर २ तास वाहतूक खोळंबा

कल्याणला ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला अन् सेंट्रल रेल्वेवर २ तास वाहतूक खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : आधीच रविवारच्या मेगाब्लॉकने रेल्वे प्रवासी हैराण असताना रविवारी दुपारी कल्याण रेल्वेस्थानकात एक ३० वर्षीय तरुण ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून बसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक  दोन तास विस्कळीत झाली. या तरुणाला  खाली उतरवण्याची धडपड सुरू असताना खांबावरून इकडून तिकडे अशा त्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर विजेच्या धक्क्याने तो खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील त्याला सुखरूपपणे उतरविण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो कुणालाच दाद देत नव्हता. विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, संबंधित व्यक्ती कोण? तो खांबावर का चढला? याबाबत लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत. 

दुपारी दीड वाजेच्या सुमारास  फलाट क्रमांक १ च्या नजीक असलेल्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर हा तरुण चढून बसला. ही बाब लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले; परंतु   कानाडोळा करत तो खांबावरून फलाट एक, एक अ, दोन आणि तीनच्या दिशेने सरकू लागला. त्याला विजेचा धक्का लागू नये म्हणून त्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

मेगाब्लॉकमुळे रविवारी रेल्वे प्रवासी हैराण असताना कल्याण रेल्वेस्थानकात एक ३० वर्षीय तरुण ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला. त्याला पोलिस, अग्निशमन दलाचे जवान खाली उतरविण्याचा प्रयत्न करत असतानाच तो कोसळला. यानंतर लोकल सेवा तब्बल दोन तास विस्कळीत झाली. छाया : आनंद मोरे

खांबावरून पुढे सरकताना   बसला विजेचा झटका…

खांबावर चढलेल्या या तरुणाला पाहण्यासाठी फलाट आणि पुलावर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. फलाटांवरील वीजपुरवठा खंडित केल्याने लोकल सेवा देखील खोळंबली होती.  उर्वरित फलाटांवरील वीजपुरवठा मात्र सुरू होता. खांबावरून पुढे सरकताना त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला तातडीने नजीकच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आले. 

स्थानकातील सुरक्षा पुन्हा ऐरणीवर 

चार आणि त्यापुढील क्रमांकाच्या फलाटांवरून लोकल तसेच लांबपल्ल्याच्या गाड्याही धावत होत्या; परंतु प्रवासी गाडीमध्ये चढण्याऐवजी त्या तरुणाचा कारनामा पाहत होते. या गर्दीमध्ये एका फलाटावर महिलेसोबत गैरकृत्य घडल्याचा प्रकार  घडला. यावेळी गोंधळही झाला होता; परंतु याबाबत कोणतीही तक्रार दिली गेलेली नाही. दरम्यान, एकूणच घडलेल्या प्रकारामुळे स्थानकामधील सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

 

Web Title : कल्याण में ओवरहेड वायर पोल पर चढ़ा व्यक्ति, रेल यातायात बाधित

Web Summary : कल्याण स्टेशन पर एक व्यक्ति ओवरहेड वायर पोल पर चढ़ गया, जिससे मध्य रेलवे का यातायात दो घंटे तक बाधित रहा। बचाव के दौरान वह बिजली के झटके से गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना ने स्टेशन सुरक्षा को लेकर चिंता जताई है, क्योंकि यात्री ट्रेनों में चढ़ने के बजाय देखते रहे।

Web Title : Man Climbs Overhead Wire Pole in Kalyan, Train Traffic Disrupted

Web Summary : A man climbed an overhead wire pole at Kalyan station, disrupting Central Railway traffic for two hours. He was electrocuted and seriously injured while being rescued. The incident raised concerns about station security, as passengers watched instead of boarding trains.